सत्ता जाऊनही आम्ही जनतेच्या पाठिशी- अशोक चव्हाण

0
12

देवरीच्या प्रचार सभेत घेतला भाजपचा समाचार

देवरी- खोट्या प्रचाराचा धुराडा उडवत आणि लोकांना भली मोठी स्वप्ने दाखवत देशात व राज्यात भाजपने सत्ता मिळवली. मात्र, सत्ता हाती येताच दिलेली आश्वासने हवेत विरली. आज लोकांचे हक्क हिरावून भांडवलदारांची घरे भरली जात आहेत. आदिवासी, दलित आणि मासागवर्गियांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या अनेक योजना बंद केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे भांडवल करून सत्तेत येणारे आज शेतकऱ्यांचीच थट्टा उडवत आहेत. यापुढे आणखी सहन करायचे नसेल तर गाव पातळीवर पुन्हा कॉंग्रेसला बळकट करा. स्थानिक निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला साथ दिली, तर आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळेल. आम्ही सत्ता गमावली असली तरी जनतेची साथ सोडली नाही. आम्ही सदैव आपल्या पाठिशी आहोत, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (ता.26) देवरी येथे केले.
स्थानिक कांचनम लॉनमध्ये आयोजित जि.प.पं.स. निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे प्रभारी व मध्यप्रदेश विधानसभेतील विरोधीपक्षनेते बाला बच्चन, माजी मंत्री नितीन राऊत, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, हसन गिलानी, कृष्णकुमार पांडे, अनंतराव घारड, श्री ओझा, आनंदराव गेडाम, नामदेवराव उसेंडी, आमदार गोपाल अग्रवाल, माजी आमदार रामरतन राऊत, सहेसराम कोरेटी आदी मान्यवर हजर होते.
पुढे बोलताना श्री.चव्हाण म्हणाले, कॉंग्रेसने कायदे करून आदिवासींची जमीन शाबूत ठेवली. गरिबांना जमिनीचे पट्टे दिले. विनोबाजींच्या भूदान चळवळीला उचलून धरले. याउलट शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून त्या उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. त्या विरुद्ध आवाज दाबण्यासाठी जमिन अधिग्रहण कायदा ब्रिटीश पद्धतीने भाजप लागू करू पहात आहे. कॉंग्रेसपक्ष हा गावपातळीवरचा विचार करणारा पक्ष आहे. याउलट भाजपचे सरकारने शेतमालाचे भाव पाडले. किमानआधारभूत किंमतही ते देण्यास तयार नाही. चार महिन्यात 1200 लोकांनी आत्महत्या केल्या. मात्र, हे सरकार एका दिवसात सर्व नियम धाब्यावर बसवून 206 कोटीची चिक्की खरेदी करते आणि मुख्यमंत्री त्याची पाठराखण करतात, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारची खिल्ली उडविली. यावेळी कमल व्यवहारे म्हणाल्या, भाजपचे सरकार गोरगरीबांच्या योजना बंद करत आहेत, तर अनेक योजनांनी केवळ नवे नामकरण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नितीन राऊत आपल्या भाषणात म्हणाले की, मूळनिवासी लोकांच्या हिताचे रक्षण केवळ कॉंग्रेस पक्षच करू शकतो. महिलांच्या सन्मानाचा प्रश्न असो की गरिबांच्या हितांचे रक्षण असो, याच्याशी भाजपला काही देणेघेणे नाही. यावेळी अन्य नेत्यांचीही भाषणे झाली.
सभेचे संचलन इंदर अरकरा यांनी केले तर उपस्थितांचे आभार ओमप्रकाश रामटेके यांनी मानले. सभेला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.