शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल ! मुख्यमंत्री फडणवीस

0
11

गोंदिया, दि २६ -काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पंधरा वर्षात महाराष्ट्रासह देशाला लुटले. शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही ठोस निर्णय घेतले नाही. युपीए शासन काळात कृषी, अर्थ व विदेशमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर झुकत शेतकऱ्याला हमी भाव न देण्याचा ‘गॅट करार केला होता. शेतकऱ्याचा हमीभाव गहाण ठेवण्याचे पाप तत्कालीन सरकारने केले होते. परंतु, मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावापुढे न झुकता युपीए शासनाचा करार रद्द करीत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तोंडून बाहेर काढले. हे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचे असून प्रसंगी शासनाची तिरोजी रिकामी करावी लागली तरी बेहतर. परंतु, शेतकरी व सर्व सामान्य नागरिक समृद्ध झाला पाहिजे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते आज २६ जून रोजी गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील मोहरान टोली मैदानावर आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री इंजि.राजकुमार बडोले, प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले, पूर्व विदर्भाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, श्रीकांत भारतीय, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे, भजनदास वैद्य, खोमेश्वर रहांगडाले, हेमंत पटले, केशवभाऊ मानकर, भेरसिंह नागपुरे, संघटनमंत्री आशिष वांदिले, जि.प. माजी अध्यक्ष नेतराम कटरे, जि.प.सभापती कुसन घासले, मोरेश्वर कटरे, भाजप जेष्ठ नेते अशोक इंगळे, भाजप महामंत्री संतोष चव्हाण,वीरेंद्र अंजनकर, दीपक कदम, तालुका अध्यक्ष नंदकुमार बिसेन, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, न.प.गटनेते दिनेश दादरीवाल, भाऊराव उके, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी, नागराचे सरपंच घनश्याम लिल्हारे, नगरसेवक घनश्याम पाणतवणे, शिव शर्मा, मुनाफ कुरेशी,प्रदीप ठाकुर, संजय मुरकुटे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘खोटे बोल पण रेटून बोल अशी भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची असते. सत्तेत असताना ६० वर्षे शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीही न करता आमचा हिशेब मागत आहेत. आता जनतेचे अच्छे दिन आले आहेत. मात्र घोटाळेबाजांचे बुरे दिन सुरू झाले असून आता त्यांना तुरूंगात चक्की पिसावी लागणार आहे. आपले सरकार सत्तेत येताच राज्यातील २५ हजार गावांत दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी ७ हजार कोटी रुपयाची मदत दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शासनकाळात १५ वर्षे केवळ यांनी गप्पाच मारल्या. मागे त्यांनी २०० रुपये बोनस जाहीर केले. मात्र ते सर्व व्यापाऱ्यांच्या घशात गेले असून भंडारा जिल्ह्यातच यांच्या नेत्यांकडून १०० कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. दरम्यान, याची चौकशी सुरू असून त्यांचे पितळ उघडे पडणार आहे. मात्र, आम्ही २५० रूपये धानावर बोनस जाहीर केला असून तो थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आणेवारीचा कायदा बदलवित शेतकऱ्यांना ५० टक्क्यांची मदत वाढविली. इतकेच नव्हे तर ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही शासनाकडून मदतीचा ओघ मिळणार आहे. आपल्या सरकारने सहा महिन्यातच शेतकऱ्यांच्या कर्जाचे पूर्नगठन करीत पाच वर्षाची मुदत शेतकऱ्यांसाठी केली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन आवश्यक असते. परंतु, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने ७० हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला. मात्र, जलयुक्त शिवार अभियानातून दरवर्षी ५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा आपला मानस आहे. त्यानुसार, येत्या ५ वर्षात संपूर्ण महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचा आपण संकल्प केला असून तो पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. पूर्वी शासनाच्या उपक्रमात लोकसहभाग कमी असायचा. परंतु, या अभियानात तब्बल ३०० कोटी रुपये लोकसहभागातून शासनाला मिळाले. जनतेचा पैसा हा जनतेच्या विकासासाठी खर्च करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. कृषी पंपासाठी तत्कालीन शासनाच्या काळात केवळ ७४ कोटी रूपये तरतुद करण्यात आली होती. मात्र आपल्या सरकारने केवळ पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी १ हजार कोटी रुपयाची तरतुद केली असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रातील शेतकरी संपन्न व्हावा, यासाठी पीक पद्धतीत अमुलाग्र बदल करणे गरजेचे असून मंडळ स्तरावर २ हजार ५९ आधुनिक हवामान केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ५०० गावात पायलेट प्रोजक्ट सुरू झाले असून हा महाराष्ट्रात देशातील पहिला प्रयोग आहे. शेतकऱ्याला त्याच्या धानाला योग्य भाव, हवामानाचा अंदाज व विम्याच्या माध्यमातून संरक्षण देण्याची जबाबदारी आपल्या शासनाची राहणार असल्याचे ते म्हणाले. रखडलेले सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आणून मामा तलावांचे खोलीकरण करून मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय करण्याचे कार्य सरकार करीत आहे. याशिवाय ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग चार महिन्याच्या आत मोकळा करण्यात आला असून नानक्रिमीलीयरची मर्यादा वाढविण्याचाही शासनाचा मानस असल्याचे ते म्हणाले. पूर्वी घरकुल योजनेत लाभार्थ्यांना केवळ घरासाठी निधी मिळायचा. परंतु, आपल्या शासनाकडून जनिमीसाठी ५० हजार रुपयाची मदत लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राज्यात येत्या काळात २ लाख घरे बांधण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार निवासी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार असून पाच वर्षात सव्वालाख विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य घटक सक्षम झाल्याशिवाय महाराष्ट्र सक्षम होऊ शकणार नाही त्यामुळे जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करून सर्वसामान्यांचा सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. आता केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून जिल्ह्याच्या विकासाकरीता जिल्हा परिषदेवर भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना ना.बडोले म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी केवळ बाबासाहेबांच्या नावावर मते मागतात. परंतु, बाबासाहेबांच्या विचारांशी त्याचे काहीही देणे-घेणे नाही. ज्या महामानवाने घटना लिहून तळागळातील नागरिकांना जगण्याचा हक्क दिला. त्या बाबासाहेबांचे लंडन येथील घर घेण्याचे सौजन्य तत्कालीन आघाडी शासन दाखवू शकले नाही. इतकेच काय बाबासाहेबांच्या स्मारकारसाठी इंदू मिलची जागा आपल्या शासनाच्या प्रयत्नाने मिळाली असल्याचे ते म्हणाले. आपल्या भाषणात खा. पटोले म्हणाले की, धानाच्या मुद्यावरून विरोधक शासनावर टिका करीत असले तरी ह्या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. आपल्या शासनाकडून १८९४ चा भुसंपादन कायदा व १९३७ ची आणेवारी पद्धत बदलण्यात आली असून यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज्यशासनाच्या पिकविमा योजनेमध्ये गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा समावेश करण्याची मागणी ही पटोले यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जिल्ह्यातील समस्या मुख्यमंत्र्याकडे मांडल्या. यात प्रामुख्याने धानाला भाव, सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात यावे, दरवर्षी बोनसमध्ये वाढ करून देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन दीपक कदम यांनी केले. तर आभार दिनेश दादरीवाल यांनी मानले. कार्यक्रमात सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.