एक डाव ७८ धावांसह इंग्लंडचा कांगारूंवर विजय

0
15

नॉटिंगहॅम (इंग्लंड), दि. ८ – ऑस्ट्रेलियाचा एक डाव व ७८ धावांनी पराभव करत इंग्लंडने केवळ चौथा सामनाच नाही तर अॅशेस मालिकाही जिंकली आहे. गेली अॅशेस मालिका कागारूंनी जिंकली होती. इंग्लंडने तिस-या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २५३ धावांमध्ये गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अवघ्या ६० धावा झाल्या होत्या तर इंग्लंडने ९ गडी बाद ३९१ धावांवर पहिला डाव घोषित केला होता.
पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेमध्ये इंग्लंडने ३ -१ अशी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे सात गडी बाद झाले होते, तर शनिवारी सकाळी पहिल्या ४० मिनिटांमध्येच इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले.
पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने अवघ्या १५ धावांमध्ये ८ गडी टिपले तर दुस-या डावात स्टोक्सने ३६ धावा देत ६ बळी टिपले. इंग्लंडच्या ज्यो रुटने १३० धावा केल्या. तर दुस-या डावात ऑस्ट्रेलियाच्या रॉजर्सने ५२ व वॉर्नरने ६४ धावा केल्या, परंतु त्या ऑस्ट्रेलियाचा डावाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.
या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्क निवृत्त होणार असून त्याच्यावर पराभूत मालिकेनंतर क्रिकेटला अलविदा म्हणण्याची वेळ येणार आहे.