‘आरोग्य विभागात डिसेंबरपर्यंत आठ हजार पदे भरणार’

0
5

मुंबई दि. ८– सामान्य नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागातील गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी कार्यक्रम निश्‍चित करून देण्यात आला असून डिसेंबर 2015 पर्यंत दोन्ही संवर्गातील एकूण 8436 पदे भरण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, की आरोग्य विभागात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने सामान्य नागरिकांना आरोग्यसेवा पुरविताना त्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्या दूर करून सर्वसामान्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी ही रिक्त पदे भरणे आवश्‍यक आहे. त्यानुसार आरोग्य संचालकांना या पदांच्या भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश विभागाला देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

भरतीचा कालबद्ध कार्यक्रम
गट क मधील एकूण 83 संवर्गामध्ये 5267, तर गट ड मधील एकूण 55 संवर्गांमध्ये 3169 अशी एकूण 8436 पदे रिक्त आहेत. भरतीचा कालबद्ध कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
25 ऑक्‍टोबर : लेखी परीक्षा
5 नोव्हेंबर : परीक्षेचा निकाल
17 ते 20 नोव्हेंबर : नियुक्तीकरिता समुपदेशन फेरी