क्रीडा संकुलाची कामे तातडीने पूर्ण करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

0
26

गोंदिया,दि.१० : गोंदिया येथे बांधण्यात येत असलेले जिल्हा क्रीडा संकुल हे खेळाडू घडविण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. या क्रीडा संकुलातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा संकुलाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.
आज सोमवारी क्रीडा संकुल परिसरातील इनडोअर हॉल येथे जिल्हा क्रीडा संकुल समितीची सभा घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी संबंधित विभागांना उपरोक्त निर्देश दिले.
सभेला विशेष अतिथी म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल यांची उपस्थिती होती. समितीचे सदस्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शरद खंडागळे, जिल्हा पोलीस अधीक्षक (गृह) सुरेश भवर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समितीचे सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, क्रीडा संकुलातील ज्या कामांचा समावेश अंदाजपत्रकात आहे ती कामे प्राधान्याने करावी. कामाची गुणवत्ता सुद्धा चांगली असावी. जलतरण तलाव, धावपट्टी आणि इनडोअर हॉलची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी. त्यामुळे खेळाडू व नागरिकांना क्रीडा संकुलाचा लवकर उपयोग करता येईल. करारनामा १३ कोटी ३३ लक्ष रुपयांचा असून त्यातील कामे अटी आणि शर्तीच्या अधिन राहून त्वरित पूर्ण झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की, जिल्हा क्रीडा संकुलात जास्तीत जास्त सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अंदाजपत्रका व्यतिरिक्त निधीची आवश्यकता असेल तर राज्य सरकारकडून निधीची मागणी करण्यात येईल. क्रीडा संकुलातील अतिरिक्त कामे करावयाचे असल्यास समितीची मान्यता घ्यावी.
केंद्र सरकारकडून क्रीडा संकूलातील सिंथेटीक ट्रॅकसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे असे सांगून श्री.अग्रवाल म्हणाले, कोणती अतिरिक्त कामे करावयाची आहेत त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे हे निश्चित केल्यावर आपण राज्यस्तरीय क्रीडा समितीकडे क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधीची मागणी करु. निविदेतील कामे संबंधित कंत्राटदाराकडून येत्या तीन महिन्यात पूर्ण करुन घ्यावी असेही आमदार अग्रवाल यावेळी म्हणाले.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.गिरी यांनी क्रीडा संकुल कामाच्या प्रगतीबाबतची माहिती यावेळी दिली. कार्यकारी अभियंता श्रीमती चव्हाण यांनी क्रीडा संकुलात वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीला १ कोटी रुपये त्वरित देण्यात येईल व अपूर्ण अवस्थेतील कामे तातडीने पूर्ण करण्याकडे आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेत क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा आढावा, झालेला खर्च, अपूर्ण कामे आणि न्यायालयीन प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी, आमदार अग्रवाल यांचेसह समितीच्या सदस्यांनी क्रीडा संकुलातील इनडोअर हॉल, जलतरण तलाव व धावपट्टीच्या कामाची पाहणी करुन आवश्यक ते निर्देश सुपर कंस्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी श्री.पंडीत यांना दिले. यावेळी क्रीडा अधिकारी अनिल निमगडे उपस्थित होते.