सानिया-हिंगीस ठरल्या ‘डबल्स वर्ल्ड चॅम्पियन्स’

0
12

वृत्तसंस्था

लंडन, दि. २३ – भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) २०१५ सालातील महिला दुहेरीतील ‘वर्ल्ड चॅम्पियन’ किताब देऊन गौरवले आहे. सानिया – हिंगीस जोडीने या वर्षात टेनिसच्या महिला दुहेरी स्पर्धेवर अक्षरश: राज्य केले आहे. यापूर्वी भारताचे लिअँडर पेस-महेश भूपती यांनी १९९९ साली पुरष दुहेरीत ‘वर्ल्ड चॅम्पियन’चा खिताब मिळवला होता.

मार्च २०१५ मध्ये एकत्र आलेल्या सानिया व हिंगीस या जोडीने यावर्षी नऊ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात विम्बल्डन व अमेरिक ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धांसह डब्ल्यूटीए टूर फायनल्सच्या विजेतेपदाचाही समावेश आहे. यावर्षी त्यांनी एकूण ५५ सामने जिंकले असून गेल्या २२ सान्यांपासून दुहेरीची ही जोडी अपराजित आहे, त्यांना अवघ्या ७ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यांच्या या नेत्रदीपक व शानदार कामगिरीमुळेच त्या दोघींनाही ‘वर्ल्‍ड चॅम्पियन्स’चा खिताब देण्यात आला आहे.