सुर्याटोला संघ ठरला प्रथम पुरस्काराचा मानकरी 

0
21
सालेकसा- दि.८तालुक्यातील भजेपार येथे नुकतेच तीन दिवसीय भव्य प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यासह जवळच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील जवळपास चाळीस कबड्डी संघ सहभागी झाले होते. राष्ट्रीय दर्जाच्या रेफरींच्या उपस्थितीत मॅटवर अत्यंत रोचक ठरलेल्या या कबड्डी स्पर्धेत गोंदिया तालुक्यातील संतगाडगेबाबा कबड्डी क्लब सुर्याटोला या संघाने प्रथम क्रमांकाचे ११ हजार १११ रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार पटकावले. राणी अवंतीबाई कबड्डी संघ भडंगा या संघाने ८ हजार ८८८ रुपये रोख आणि स्मृतिचिन्हासह द्वितीय स्थान पटकावले तर नवयुवक प्रौढ कबड्डी क्लब भजेपार संघाने ५ हजार ५५५ रुपये रोख आणि स्मृतिचिन्हासह तृतीय पारितोषिक पटकावले. यासह मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट डिपेंâडर, बेस्ट रिडर, बेस्ट रेफरी असे अनेक पुरस्कार सहभागी खेळाडूंनी पटकावले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे तर बक्षीस वितरक म्हणून जि.प.सदस्या लता दोनोडे यांसह प्रमुख अतिथी म्हणून सरपंच प्रभाबाई कलचार, चंद्रकुमार बहेकार, तंमुस अध्यक्ष कृष्णकुमार चुटे, पुरनलाल बहेकार, लोकेश चुटे, अखिलेश बहेकार, दिलीप पाथोडे, राजाराम चुटे, टेकचंद बहेकार, अरूण चुटे, सरस्वताबाई बहेकार, क्रिष्णाबाई बहेकार, संजु दोनोडे, चंभरू शिवणकर उपस्थित होते. बक्षीस वितरणानंतर लगेच स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या विद्याथ्र्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकुमार पाथोडे, उपाध्यक्ष हेमंत बहेकार, सचिव विजय बहेकार, सहसचिव हेमंत चुटे, तुलशी ब्राम्हणकर, अमृत कलचार, सुभाष मरस्कोल्हे, विनोद दामनकर, डोमेश्वर चुटे, डोमेश्वर मेंढे, अविनाश बहेकार, शामराव कलचार आदिंसह भजेपार ग्रामवासीयांनी अथक परिश्रम घेतले.