IPL स्पॉट फिक्सिंग : अजित चंदिलावर BCCI ने घातली आजीवन बंदी

0
9
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. १८ – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने क्रिकेटपटू अजित चंडेलावर आजन्म बंदी घातली असून स्पॉट फिक्सिंगचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबई रणजी संघाचा खेळाडू हिकेन शहावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणी बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीचे तीन सदस्य शशांक मनोहर, ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शहा यांनी चंडेला व शहाची चौकशी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी चंडेला व शहा हे समितीसमोर हजर राहिल्यानंतर त्यांना ४ जानेवारी पर्यंत लेखी उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरण उजेडात आल्यानंतर अजित चंडेला, त्याचे राजस्थान रॉयल्सचे सहकारीएस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. त्या तिघांपैकी श्रीशांत व अंकित चव्हाण यांच्यावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. तर आज बीसीसीआयने चंडेलावरही आजन्म बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला.
तर बीसीसीआयच्या लाचलुचपतविरोधी नियमांचा भंग केल्याचा आरोप  मुंबई रणजी संघाचा खेळाडू हिकेन शहावर ठेवण्यात आला असून त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा हॅन्सी क्रोनिए याच्यावर मॅचफिक्सिंगप्रकरणी आजन्म बंदी टाकण्यात आली होती. 
पाकिस्तानचा माजी अंपायर असद रऊफ सुनावणीसाठी गैरहजर राहिले. पण त्यांनी उत्तर पाठवले होते. तपास प्रक्रियेवर समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा चौकशीची मागणी केली होती. 
– डिसिप्लीनरी कमेटीने त्यांची मागणी अमान्य करत त्यांना लेखी निवेदन सादर करण्याची अखेरची संधी दिली आहे. 
– त्यांनी 9 फेब्रुवारी 2016 पर्यंत सर्व डॉक्युमेंट्स जमा करावे लागतील. पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होईल. 
– रऊफ यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ते पुन्हा कधीही भारतात आले नाही.