स्पर्धेमुळे अपंग खेळाडूंच्या सुप्त गुणांना संधी- पालकमंत्री बडोले

0
19

राज्यस्तरीय अपंग मैदानी स्पर्धा

गोंदिया,दि.३० : अपंग बांधव हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. कोणत्याही कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा वागणण्याजोगी आहे. अपंगासाठी आयोजित करण्यात आलेल्या मैदानी स्पर्धांमधून त्यांच्या ठिकाणी असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना संधी मिळते. असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकूल येथे आजपासून (ता.३०) आयोजित दोन दिवशी बाराव्या वरिष्ठ आणि सहाव्या कनिष्ठ राज्यस्तरीय अपंगाच्या अजिक्यपद मैदानी क्रीडा स्पर्धा सन २०१५-१६ चे उद्घाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंदियाचे नगराध्यक्ष कशिश जायसवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, श्रीमती रेणूका बिडकर, पॅरा राज्याध्यक्ष विनोद नरवडे, प्रविण उघडे, डॉ. दयानंद कांबळे, अपूर्व अग्रवाल यांची उपस्थिती होती. अपंगांना ३ टक्के आरक्षण, त्यांच्यासाठी निधीची तरतूद, घरकूल योजनेचा लाभ आणि १ हजार रुपये मानधन देण्याचे निश्चित केले. ५ टक्के आरक्षण अपंग खेळाडूंना देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून अंधश्रध्दा निर्मुलनासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
श्री जायस्वाल म्हणाले, पुर्णत्वाकडे वाटचाल करीत असलेले जिल्हा क्रीडा संकूल भविष्यात जिल्हयातून अनेक खेळाडू घडविण्यास उपयुक्त ठरणार आहे. विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा या संकूलात घेण्यात येणार असल्यामुळे क्रीडा स्पर्धेचे वातावरण जिल्हयात निर्माण होण्यास मदत होईल.
श्री गिरी म्हणाले, राज्य पॅरा ऑलीम्पीक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा सन्मान जिल्हयाला मिळाला आहे. या स्पर्धेतून अनेक खेळाडू पूढे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत आपली कामगिरी उत्तम बजावतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
३० व ३१ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या दोन दिवशीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील ३२० अपंग खेळाडू सहभागी झाले आहे. यामध्ये २२८ मुले व ९२ मुलींनी सहभाग घेतला आहे. कोल्हापूर जिल्हयातून सर्वाधिक खेळाडू सहभागी झाले असून २७ खेळाडू गोंदियाचे आहेत. कनिष्ठ गटामध्ये १८ वर्षाखालील व वरिष्इ गटामध्ये १८ वर्षावरील खेळाडूंचे दोन गट तयार करण्यात आले असून यामध्ये १०० मीटर व २०० मीटर धावणे, भाला फेक, गोळा फेक, थाळी फेक, आणि लांब उडी या खेळांचा या मैदानी स्पर्धेत समावेश आहे.
राज्यस्तरीय पॅरा ऑलीम्पीक क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव अनिल सहारे, शोभेलाल भोंगाडे,‍ दिनेश पटेल, दिगंबर बन्सोड, अभय अग्रवाल, मुजीर शेख, निलेश फुलबांधे यांच्यासह क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहे. संचालन व आभार जनार्धन कुसराम यांनी मानले.