पाकिस्तान आऊटः रविवारी भारत – ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल

0
7
मोहाली, दि. २५ – आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वीस षटकात १९३ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने निर्धारीत वीस षटकात आठ बाद १७२ धावा केल्या. पाकिस्तानने अखेरपर्यंत विजयासाठी शर्थ केली पण त्यांना यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामधील साखळी गटातील पुढचा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. या सामन्यातील विजयी संघ उपांत्यफेरीत तर, पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
पाकिस्तानकडून खालिद लतिफने सर्वाधिक ४६ धावा केल्या. शोएब मलिकने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून रहात २० चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. उमर अकमलने ३२, सलामीवीर शरजील खानने ३० धावा केल्या. यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार शाहीद आफ्रिदीने १४ धावा केल्या. त्याचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा शेवटचा सामना असू शकतो.
कर्णधार स्टीव्हन स्मिथची ४३ चेंडूतील ६१ धावांची तडाखेबंद नाबाद अर्धशतकी खेळी आणि शेन वॉटसनने २१ चेंडूत फटकावलेल्या नाबाद ४४ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य दिले होते.