विद्यापीठाच्या महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी- योगासनमध्ये पटकाविले सुवर्णपदक

0
11
– खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स स्पर्धा
नागपूर-उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला संघाने योगासन प्रकारात सुवर्णपदक प्राप्त करीत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.
वाराणसी येथे झालेल्या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला संघाने सर्व आसने अचूकरित्या पूर्ण करीत सर्वाधिक ४०७.० गुणांची नोंद करीत सुवर्ण पदक आपल्या नावे केले. रौप्यपदक ३९८.४२ गुणांसह कुरुक्षेत्र विद्यापीठाने तर कांस्यपदक ३९३.१ गुणांसह रांची विद्यापीठाने प्राप्त केले. डॉ. तेजसिंह जगदाळे यांच्या मार्गदर्शनात खेळलेल्या विद्यापीठाच्या महिला संघात कल्याणी चुटे (डॉ. मोटघरे महा.), छकुली सेलोकर, रचना अंबुलकर (दोन्ही प्रियदर्शनी अभियांत्रिकी महा.), सृष्टी शेंडे (स्वामी रामानंदन तीर्थ महाविद्यालय), नुपूर बकाले (नबीरा महा. काटोल), आलिशा गायमुखे (कमला नेहरु महा.) यांचा समावेश आहे.
मागील वर्षी झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पुरुष संघाने सुवर्ण तर महिला संघाला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. महिला संघाचे सुवर्ण पदक अगदी थोड्या गुणांनी हुकले होते. परंतु यंदा महिला संघाने आपल्या कामगिरीत सुधारणा करुन नागपूर विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून दिले. सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या महिला संघाची कामगिरी ही निश्चितच कौतुकास्पद आहे. शुक्रवारी विद्यापीठाचा पुरुष संघ योगासन प्रकारात सहभागी होणार आहे. पुरुष संघाकडूनही सुवर्ण पदकाची अपेक्षा असल्याची माहिती नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिली. महिला संघाने केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल रातुम नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे तसेच संघ निवड समितीचे सदस्य डॉ. सोनाली शिरभाते, डॉ. देवेंद्र वानखेडे, डॉ. तेजसिंह जगदाळे, अनिल मोहगांवकर व प्रशिक्षक संदेश खरे, सिद्धार्थ खरे, भूषण टाके यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.
अल्फिया पठाण अंतिम फेरीत
स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये विद्यापीठाची स्टार खेळाडू अल्फिया पठाण हिने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी अल्फियाची उपांत्यफेरीची लढत सीसीएसयूच्या दिपीका रीच सोबत होती. परंतु प्रतिस्पर्धी वेळेवर हजर न होउ शकल्याने अल्फियाला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. अल्फियाची अंतिम फेरी शुक्रवारी रंगणार आहे. तर आर्चरीमध्ये दीपक कुमारने चवथे स्थान प्राप्त केले. अवघ्या चार गुणांनी दीपक कुमारचे कांस्यपदक हुकले. १४४ गुणांसह कांस्यपदक जीएनडीयू अमृतसरच्या रितीक शर्माने प्राप्त केले.