चंद्रपूरच्या रोहित दत्तात्रयची गरुडझेप

0
13

नागपूर – केवळ जिद्द व मेहनतीच्या जोरावर क्रिकेटला पोषक वातावरण नसलेल्या चंद्रपूर शहरातील रोहित दत्तात्रयने 16 वर्षे मुलांच्या विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करून भारतात “नंबर वन’ गोलंदाज बनण्याचा मान मिळविला. रोहितमधील गुणवत्ता व समर्पणवृत्ती बघता तो चंद्रपूरचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनला, तर नवल वाटू नये. खंबीरपणे त्याच्या पाठीशी असलेल्या परिवारालाही त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्‍वास आहे.
रोहितने मंगळवारी संपलेल्या 16 वर्षांखालील मुलांच्या विजय मर्चंट चषक क्रिकेट स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये तब्बल 34 विकेट्‌स मिळवून विदर्भाला तिसऱ्यांदा बादफेरीत प्रवेश मिळवून दिला. साखळी फेरीत सर्वाधिक विकेट्‌स घेणारा तो भारतातील एकमेव गोलंदाज ठरला. फिरकीपटू असलेल्या 15 वर्षीय रोहितने मध्य प्रदेशविरुद्ध सात बळी, राजस्थानविरुद्ध नऊ, उत्तर प्रदेशविरुद्ध सात आणि छत्तीसगडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 11 गडी बाद करून विदर्भाला मध्य विभागात “चॅम्पियन’ बनविले.

चंद्रपूर येथील युथ क्रिकेट असोसिएशनमध्ये (वायसीए) शैलेंद्र भोयर आणि कार्तिक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरविणाऱ्या रोहितने अकराव्या वर्षीच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मोठ्या भावासोबत (यश) कॅम्पमध्ये जात असताना एकदिवस रोहितलाही क्रिकेटचा लळा लागला. प्रशिक्षकांनी त्याच्यातील टॅलेंट हेरल्यानंतर रोहितची थेट व्हीसीए संघात “एंट्री’ झाली. 12 वर्षांचा असताना रोहितला 14 वर्षांखालील राजसिंग डुंगरपूर ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात 10 गडी बाद करून त्याने आपल्यातील “टॅलेंट’चा परिचय करून दिला. एनसीएत झालेल्या स्पर्धेतही त्याने लक्ष वेधून घेतले.