पराभूत उमेदवाराकडून तलवार हल्ला

0
9

भंडारा,दि.22 : तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांकडून तलवारी निघाल्या. या घटनेत दोन्ही गटातील प्रत्येकी दोन जण जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी १२.४० वाजताच्या सुमारास शहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लायब्ररी चौकात घडली.

सोमवारला नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शहरात या निवडणुकीचीच चर्चा आहे. कुणाची मते कुणाला मिळाली किंवा मिळाली नाही, या कारणावरून मागील दोन दिवसांपासून या दोन्ही गटात धुसफूस सुरू आहे. या अंतर्गत कलहाचे रूपांतर आज मारहाणीत झाले. बुधवारला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास एका गटातील इसमाने दुसऱ्या गटाच्या इसमाशी वाद झाला. वाद वाढल्यानंतर एकाने हात उगारला. त्यानंतर तलवारी निघाल्या. त्यानंतर या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. परिणामी या परिसरात खूप वेळ संघर्ष व तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कावरे रूग्णालय परिसर ते नगरपरिषद गांधी विद्यालयाच्या भागात सुमारे तासभर हा राडा सुरूच होता. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस ताफा वेळेवर पोहोचल्याने अनर्थ टळला.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लायब्ररी चौकातील फुटपाथसह मुख्य दुकानदारांना दुकाने बंद करायला लावली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण हे घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली. लायब्ररी चौकात जमलेला समुदाय पोष्ट आॅफीस चौक ते बसस्थानक मार्गावर असलेल्या एका कार्यालयाजवळ एकत्रित झाला.मतांच्या राजकारणावरून संबंधित गटाने मारहाण केली, असा आरोप करून दोषींविरूद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या एका गटाने लावून धरली.

यावेळी पोलीस दलाची विशेष कुमक तैनात करण्यात आली होती. दुसरीकडे मारहाणीत जखमी झालेल्यांपैकी दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात तर उर्वरीत दोघांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नईमउद्दीन कमरुद्दीन शेख (५१) रा.बैरागीवाडा व आरिफ सलाम पटेल (३५) रा.अन्सारी वॉर्ड अशी जिल्हा रूग्णालयात दाखल केलेल्या जखमींची नावे आहेत. दोघांचेही बयाण नायब तहसीलदार गावंडे व पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी नोंदविले आहेत.