जिल्हाधिकार्‍यांकडून सायकलपटू सुशिकलाचा सत्कार

0
11

भंडारा : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप सायकलिंग स्पर्धेत सुशिकला आगाशे या मोहाडी तालुक्यातील नीलज (करडी) येथील खेळाडूने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. या अलौकिक कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या प्रंसगी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले उपस्थित होत्या. तिचे पालक दुर्गाप्रसाद आगाशे यांचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यामध्ये पात्र ठरणार्‍या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा प्रबोधिनीमध्ये सुशिकला आगाशेची सन २0११-१२ मध्ये राज्यस्तरावर निवड करण्यात आली. क्रीडा प्रबोधिनी नागपूर येथे तिला सरावासाठी प्रवेश देण्यात आला. सायकलिंग या खेळामध्ये असलेली सुशिकलाची कामगिरी व प्रावीण्य पाहून तिचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे स्थलांतरण करण्यात आले. या क्रीडा प्रकारातील तिच्या कौशल्याचा सराव महाराष्ट्र शासनाच्या वतीने करून घेण्यात आला. या विशेष प्रशिक्षणाच्या जोरावर सन २0१४ मध्ये केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक प्राप्त केले. सुशीकलाच्या प्रावीण्याची दखल घेऊन भारतीय खेळ प्राधिकरणाने तिची निवड भारतीय संघामध्ये करून तिला अँडव्हांस ट्रेनिंग देण्यात आली. सुशीकलाने आपल्या परिश्रमाच्या बळावर भारताला कांस्यपदक मिळवून दिले. जिल्ह्याचा नावलौकिक आंतरराष्ट्रीयस्तरावर केला.