शिवसेनेतर्फे १ मार्च रोजी जिल्हाबंद आंदोलन

0
10

भंडारा दि. २४ -: शिवसेनेच्या बैठकीत जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या उन्हाळी पिकांवर विद्युत भारनियमनाची कुर्‍हाड व सर्वसामान्य जनतेवर लादलेले भरमसाट विद्युत बिल विद्युत विभागाचा तीव्र निषेध करण्यासाठी १ मार्च रोजी जिल्हाबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. साईप्लाझा येथे जिल्हा बैठक पार पडली.शिवसेना जिल्हाप्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी पक्ष बळकटीने वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख व आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते.
रोजगारामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक उद्योग कारखान्यात भूमिपुत्र स्थानिकांना कमीत कमी ७0 टक्के रोजगार मिळावे, तरुण बेरोजगारांना स्थानिक कारखान्यात रोजगार मिळाले पाहिजे, तरुण युवा बेरोजगारांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्ह्यात युवा महाउत्सव कार्यक्रम घेण्यावर चर्चा करण्यात आली. या युवा महोत्सवासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आमंत्रण देण्याचे बैठकीत निश्‍चित झाले. युवा महोत्सव कार्यक्रम एप्रिल महिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पाचगाव येथील नवोदय विद्यालयाचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, यासाठी पाचगाव येथे येणार्‍या मार्च महिन्यात आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीत मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. काही कार्यकर्त्यांनी यावेळी पक्षात प्रवेश घेतला. मनसेचे भरत वंजारी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. संचालन संजय रेहपाडे यांनी केले तर आभार ओमेश्‍वर वासनिक यांनी मानले.