अमरावतीचा अब्दुल सोहेब ‘विदर्भ केसरी’

0
7

वर्धा दि.४-: अमरावतीचा अब्दुल सोहेब विदर्भ केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. वर्ध्याच्या देवळीतल्या नगर परिषद शाळेच्या मैदानावर विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं नुकतंच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुख्य किताबासाठी झालेल्या कुस्तीत अब्दुल सोहेबनं वाशिमच्या ज्ञानेश्वर गादेकरवर गुणांवर मात केली.विदर्भ केसरी किताबाची ही कुस्ती अमरावतीचा अब्दुल सोहेब आणि वाशिमचा ज्ञानेश्वर गादेकर या दोन पैलवानांमध्ये रंगली. अब्दुल सोहेबनं या कुस्तीवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवून चार गुण वसूल केले.ज्ञानेश्वर मात्र या कुस्तीतून केवळ एकच गुण वसूल करता आला. त्यामुळं साहजिकच अमरावतीच्या अब्दुल सोहेबनं तीन गुणांच्या फरकानं कुस्ती जिंकून विदर्भ केसरी किताबाचा मान मिळवला.विदर्भ केसरी कुस्तीत पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांचा समावेश होता. या दोन्ही गटांमध्ये मिळून 210 पैलवान सहभागी झाले होते. पुरुष गटात अमरावतीचा अब्दुल सोहेब विदर्भ केसरी किताबाचा मानकरी ठरला, तशीच महिला गटातही अमरावतीचीच तेजस्विनी दहिकर सर्वोत्तम ठरली. नागपूरच्या शीतल सव्वालाखेला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागले.
अब्दुल सोहेबनं विदर्भ केसरी कुस्तीतल्या आपल्या यशाचं श्रेय गुरु आणि आईवडिलांना दिले. अब्दुलनं खरं तर विदर्भ केसरी किताबाचे स्वप्न पाच वर्षांपूर्वी पाहिले होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यानं आपल्या महत्त्वाकांक्षेला प्रयत्नांची जोड दिली. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात अब्दुलनं रोज सहा तास कसून सराव केला होता. आता भविष्यात महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी किताब मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.विदर्भातल्या पैलवानांना त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिलं.