बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव भारत फायनलमध्ये

0
5

 बर्मिगहॅम, दि. 15 – चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव करत भारताने फायनलमध्ये थाटात धडक मारली आहे. फायनलमध्ये भारताचा सामना बेभरवशाच्या पाकिस्तान संघासोबत होणार आहे. पावसाटी कृपा , नशीबाची मिळालेली साथ आणि मोठ्या संघांना धक्का देण्याची सवय या सर्व गोष्टी पाकिस्तानच्या पथ्यावर पडल्या आणि पाकिस्तानने फायनलमध्ये जागा मिळवली. पण आता अंतिम सामन्यात त्यांना कट्टर प्रतिद्वंदी बलाढ्य भारताचा सामना करायचा आहे.भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा लिलया पराभव केला होता. आता भारताने बांगलादेशला हरवल्यामुळे क्रिकेटरसिकांना येत्या रविवारी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरची सर्वात मोठी लढाई पाहायला मिळणार आहे. या लढतीआधी नेहमीप्रमाणे मैदानाबाहेर सोशल मीडियावरही वातावरण गरम झालेलं पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले होते. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहिमने 123 धावांच्या केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेशने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजीमध्ये चातुर्याने केलेले बदल आणि मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी केलेला टिच्चून मारा याच्या जोरावर भारताने बांगलादेशला 7 बाद 264 धावांवरच रोखले होते. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न बांगलादेशी फलंदाजांनी केला होता. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल (70) आणि मुशफिकूर रहिम (61) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 123 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने 2 बाद 150 अशी मजल मारली होती. 

 पण ही जोडी धोकादायक ठरतेय असे वाटत असतानाच विराटने केदार जाधवच्या हाती चेंडू दिला. मग केदारने तमीम आणि मुशफिकूरची विकेट काढत भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. शाकिब अल हसन (15) आणि महमदुल्ला (21) हेही झटपट बाद झाल्याने बांगलादेशच्या डावाला ब्रेक लागला. अखेर निर्धारित 50 षटकात त्यांना 7 बाद 264 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन तर, रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.