चंद्रपूर व बल्लारपूर येथील रेल्वे स्थानके हरित रेल्वे स्थानके होणार

0
9

मुंबई, दि. 15 :  वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करून ही रेल्वे स्थानके हरित रेल्वे स्थानक म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील पहिली हरित रेल्वे स्थानके ठरणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाबत जनजागृती व पर्यटन वाढीच्या दृष्टीने व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी चंद्रपूर व बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचे सवाई माधोपूरच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वे स्थानकाच्या खुल्या जागेवर शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर
यांना ताडोबाच्या धर्तीवर चित्र रंगविण्याची परवानगी देण्यात आली असून त्या माध्यमातून वन आणि वन्यजीव यांचे महत्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच अधिष्ठाता शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर यांनी या संदर्भात सादर केलेल्या अंदाजपत्रकांना शासनाने मान्यता दिली असून या शासकीय संस्थेच्या माध्यमातून तसेच कला संचालनालयाच्या माध्यमातून ही दोन्ही रेल्वे स्थानके हरित रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येतील. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याचा वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातून चंद्रपूर आणि बल्लारपूर ही दोन्ही रेल्वे स्थानके आता
हिरवाईने नटून नवे रूप धारण करत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहेत.