अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय सांघिक खेळाचे महत्व अनन्यसाधारण-मंगेश मोहिते

0
18

गोंदिया,दि.१६ : सांघिक पध्दतीच्या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असतो. त्यामुळे संघ भावनेची वाढ होते. कुणी आपल्या संघासाठी खेळतो त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. सांघिक खेळामुळे एकात्मतेची भावना निर्माण होत असल्यामुळे अशा प्रकारच्या खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांनी व्यक्त केले.
१५ सप्टेबर रोजी इंदिरा गांधी स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा कार्यालय, शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमयङ्क या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.मोहिते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपशिक्षणाधिकारी सुरेश मांढरे, स्काऊट ॲन्ड गाईड कार्यालयाच्या जिल्हा संघटक मनिषा तराळे, तालुका क्रीडा संयोजक एस.ए.वहाब, फुटबॉल असोशिएशनचे खुर्शिदभाई, लेखाधिकारी एल.के.बाविस्कर, डॉ.हरगोविंद चौरसीया, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांची उपस्थिती होती.
श्री.मोहिते पुढे म्हणाले, सांघिकपणे खेळतांना मदत केली पाहिजे ही भावना देशपातळीवर देखील दिसून येते. एकमेकांशी आपली स्पर्धा असते. मात्र संघ म्हटला की आपण सर्वजन सारखे असतो आणि संघासाठी आपण एकमेकांना मदत करतो. जीवनात प्रत्येकाने एकमेकांना मदत केली तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होवू शकतो असेही ते म्हणाले.
यावेळी क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या तालुका क्रीडा संयोजक एस.ए.वहाब, फुटबॉल असोशिएशनचे खुर्शिदभाई यांचा अपर जिल्हाधिकारी श्री.मोहिते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकातून माहिती देतांना श्री.गांगरेड्डीवार म्हणाले, पुढील ऑक्टोबर महिन्यात फिफा वर्ल्ड कप फुटबॉलचे आयोजन आपल्या देशात होत आहे. त्यापैकी ६ सामने आपल्या राज्याची राजधानी असलेल्या मुंबई येथे होत आहेत. ग्रामीण भागात सुध्दा फुटबॉल खेळाची चळवळ गतीमान झाली पाहिजे. जिल्ह्यात आज १२३२० खेळाडू फुटबॉल खेळत आहेत. यामध्ये ८२२० मुले आणि ४१०० मुली यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध मैदानावर आज १६००० खेळाडू फुटबॉल खेळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला गोंदिया येथील एनएमडी महाविद्यालय, एस.एस.गर्ल्स महाविद्यालय, मनोहर मुन्सीपल हायस्कूल, राजस्थानी मारवाडी हायस्कूल, महावीर महाविद्यालय, गुरुनानक इंग्लीश मिडियम स्कूल, मनोहर मुन्सीपल कॉन्व्हेंट, एन.एम.पटेल महाविद्यालय, गोंदिया फुटबॉल अकॅडमी, सिटी क्लब गोंदिया आदी संघाचे फुटबॉल खेळाडू यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके, वरिष्ठ लिपीक डी.एस.बारसागडे, शिवचरण चौधरी, रवी परिहार यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते. श्री.मोहिते यांनी फुटबॉलला कीक मारुन खेळाचा शुभारंभ केला. संचालन क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी मानले.
०००००