क्रीडा स्पर्धेत यशस्वी व्हा – राजकुमार बडोले

0
21

सडक/अर्जुनी,दि.25 : देशात लोकशाही व्यवस्था आहे. नक्षल्यांना बंदुकीच्या बळावर काहीही करता येत नाही. संविधानाने लोकांच्या मताला महत्व दिले आहे. मतदानाच्या पेटीतूनच राजा जन्माला येतो. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील युवावर्गाने इतरत्र न भरकटता विकासाची कास धरावी. पोलीस विभागाच्या वतीने आयोजित सुरक्षा दौड स्पर्धेत सहभागी होवून यश संपादन करावे. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. तालुक्यातील पांढरवाणी येथे नुकतेच गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने बिरसा मुंडा जयंती पंधरवाड्याच्या निमित्ताने नक्षलग्रस्त क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे खेळांमधील करीयर घडविण्यासाठी तालुकास्तरीय सुरक्षा दौड कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, पं.स.सभापती कविता रंगारी, अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, शेषराव गिरेपुंजे, गोंगले सरपंच डी.यु.रहांगडाले यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री पुढे म्हणाले, लोकसहभागातून अनेक कामे यशस्वी होतात. पोलीस दलाच्या वतीने सुरक्षा दौडचे देखील लोकसहभागातून यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नक्षलग्रस्त भागातील युवावर्गात मोठ्या प्रमाणात क्रीडा गुण आहे. अशा प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धेतून त्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण दिसून येण्यास मदत होते. येथूनच त्यांना जीवनाचा यशस्वी मार्ग मिळतो. रन फॉर सेक्युरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.श्री.भूजबळ म्हणाले, सुरक्षा दौडला आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 5 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या दौडमध्ये सहभाग घेतला आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातून 600 च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. नक्षलविरोधी जनजागरण विद्यार्थ्यांमध्ये व्हावे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेतून यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना धावण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सुरक्षा दौड निमित्ताने आयोजित कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व क्रीडा कौशल्य दिसून येत असल्याचे सांगून श्री.भूजबळ म्हणाले, सुरक्षा दौड हा समाज जागृती व प्रबोधन करणारा कार्यक्रम आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम करावे. त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सुरक्षा दौडमध्ये सडक/अर्जुनी तालुक्यातील 36 शाळा व वसतिगृहांच्या 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तालुकास्तरीय दौड स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. तालुक्यातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य व प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर पर्वते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार श्री.मेश्राम यांनी मानले.