विकास कामे व महसूल वसुली उद्दिष्ट नियोजनातून वेळेत पूर्ण करा- विभागीय आयुक्त अनूप कुमार

0
9

गोंदिया,दि.२५ : विविध यंत्रणांना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येतो. महसूल विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. यंत्रणांनी व महसूल विभागाने आपली कामे नियोजनातून निर्धारित वेळेत पूर्ण करावी. असे निर्देश विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात २५ नोव्हेंबर रोजी विविध यंत्रणा व महसूल विभागाचा आढावा घेतांना श्री.अनूप कुमार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, उपवनसंरक्षक एस.युवराज, उपायुक्त सुधाकर तेलंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.बी.मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.अनूप कुमार म्हणाले, यावर्षी पाऊस कमी आल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. भविष्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नियोजन आतापासूनच करावे. भूजल संरक्षण अधिनियम कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन दयावा. रेतीघाटामुळे ज्या गावाचे रस्ते खराब झाले आहे त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खनिज विकास प्रतिष्ठानमधून निधी उपलब्ध करुन दयावा. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात वाव असल्यामुळे पर्यटनस्थळांचा विकास करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे मार्केटींग करावे. निसर्ग संवर्धनासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने देखील संवर्धन झाले पाहिजे असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करावा असे सांगून श्री.अनूप कुमार म्हणाले, धापेवाडा टप्पा-२, झाशीनगर उपसा सिंचन योजना, निमगाव प्रकल्प, पिंडकेपार/डांगुर्ली प्रकल्प, मानागड प्रकल्प या प्रकल्पाच्या पुर्णत्वाला देखील गती मिळाली पाहिजे. बिरसी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवावे. जिल्हा परिषदेतील वर्ग-२ चे रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा व त्याबाबत पाठपुरावा करावा. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटूंबातील व्यक्ती शौचालयाचा नियमीत वापर करतील यासाठी प्रवृत्त करावे. बँकेशी समन्वय साधून सहकार विभागाने पीक कर्ज योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उपलब्ध होताच जमा करावे असे ते म्हणाले.
धडक सिंचन विहिर कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण होणार असल्याचे सांगून श्री.अनूप कुमार म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर पिके घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावे. रोहयोच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे उपलब्ध झाल्यास मजुरांच्या हाताला काम मिळेल व त्या माध्यमातून विकास कामे करतांना जिल्हा राज्यात अव्वल कसा राहील याचे नियोजन करावे. कामात दिरंगाई करणाऱ्याची गय केली जाणार नसून टिम वर्क म्हणून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी महसूल वसुलीचा आढावा घेतला.
डिसेंबर अखेरपर्यंत पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगून श्री.ठाकरे म्हणाले, यावेळी रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येणार नाही. अवैध रेती उत्खनन होणार नाही याकडे लक्ष दयावे. महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून निर्धारित वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.भूजबळ यांनी नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता विशद केली. तसेच पोलीस गृह निर्माण योजनेअंतर्गत पोलिसांच्या शासकीय निवासस्थान व पोलीस स्टेशन इमारतीबाबतची माहिती दिली. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.