प्रत्येक बालकाला कायदयाचे ज्ञान असणे गरजेचे- न्या.भोसले

0
10

गोंदिया,दि.२५ : विधी संघर्ष करुन बालकांचे समाजात पुनर्वसन करणे हा बाल न्याय कायदयाचा मुख्य उद्देश आहे. अपराध, पोलीस स्टेशन, कोर्ट-कचेरी असे शब्द ऐकले की मनामध्ये भिती निर्माण होते. शांतता लाभावी यासाठी हे क्षेत्र निर्माण केले आहे. मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी करणे, बनावट दस्तावेज तयार करणे अशाप्रकारचे गुन्हे बालकांकडून घडत असतात. अशाप्रकारचे गुन्हे बालकांकडून घडू नये यासाठी त्यांना कायदयाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन न्या.भोसले यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व जि.प.पूर्व माध्यमिक मुला-मुलींची शाळा कुडवा यांच्या संयुक्त वतीने साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी माजी सरकारी वकील बिणा वाजपेई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, वकील बार असोसिएशनचे एस.बी.डहारे, पुर्व माध्यमिक शाळा कुडवाचे शिक्षक एन.एस.चौरे यांची उपस्थिती होती.
न्या.भोसले पुढे म्हणाले, बाल गुन्हेगारांसाठी रिमांड होमचे प्रोव्हीजन केले जाते. त्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे बाल गुन्हेगारांमध्ये सुधारणा होवून ते जीवनात यशस्वी व्हावेत हा आहे. कोणत्याही बालकांनी आपण गरीब आहोत, ग्रामीण आहोत, आपण काही करु शकणार नाही अशाप्रकारचे विचार मनात आणू नये. फक्त मनात जिद्द असावी. चांगल्या सवयी बालकांनी आत्मसात करायला पाहिजे. त्यांनी वरिष्ठांचा आदर करावा असेही ते यावेळी म्हणाले.
बिणा बाजपेई यांनी फटाके फॅक्टरी, माचिस फॅक्टरी यामध्ये काम करणे हा कायदयाने गुन्हा आहे. यावेळी त्या मुलांना असे काम करण्यास भाग पाडू नये असे सांगितले. श्री.चौरे म्हणाले, मुलांचे शिक्षणाचे अधिनियम २००९ तयार करण्यात आले आहे. बालकांचे लैंगीक शोषण करणे हे कायदयाने गुन्हा आहे असे सांगितले. श्री.कटरे म्हणाले, १५ टक्के संख्या ही बालकांची आहे. दैनंदिन जीवनात आपली जबाबदारी काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीची जाणीव असणे गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानाशिवाय सामाजिक ज्ञान सुध्दा असणे आवश्यक आहे असे सांगितले. श्री.सयाम म्हणाले, प्रत्येकांनी खरे बोलावे. प्रत्येक गोष्टींचे नियमाने पालन करावे. आई-वडिलांचे नाव लौकीक करावे. श्रीमती पाटील म्हणाल्या, प्रत्येक बालकांनी आपल्या शाळेचा, गावाचा, आई-वडिलांचा समाजात नाव लौकीक करावा व थोर पुरुष बनण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.ग.बोरीकर, जी.सी.ठवकर, दिपाली थोरात, प्रेक्षिक गजभिये, एल.पी.पारधी, ए.जे.नंदेश्वर, गुरुदयाल जैतवार, आर.डी.बडगे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ॲड.ज्योती भरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार एन.एस.चौरे यांनी मानले.