न्यूझीलंडची सलामी़ः श्रीलंकेवर ९८ धावांनी मात

0
12

क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत विजयी सलामी दिली.
ख्राईस्टचर्च –क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत विजयी सलामी दिली. विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला श्रीलंकेचा डाव २३३ धावांत संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने ९८ धावांनी विजय मिळवला.
दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंड संघाने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय साकारला. न्यूझीलंड संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली.
न्यूझीलंडच्या ब्रॅडन मॅकक्युलम, केन विल्यमसन्स आणि कोरे अँडरसन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ३३१ धावा केल्या. मात्र श्रीलंका संघाला हे आव्हान पूर्ण करण्यात अपयश आले. श्रीलंकेच्या संघाने पुरती निराशा केली. श्रीलंकेच्या लाहिरु थिरीमने आणि अँजेलो मॅथ्यूज वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. अखेर श्रीलंकेचा डाव २३३ धावांत आटोपला.
न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले ३३२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात समाधानकारक झाली. संघाने अर्धशतकी टप्पा पार केल्यानंतर सलामीवीर तिलकरत्ने दिलशान बाद झाला. त्याने २४ धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकी खेळी साकारणाला लाहिरु थिरीमने ६५ धावा करुन तंबूत परतला. हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर कुमार संगकारा मैदानावर उतरला आणि सावध फलंदाजीस सुरुवात केली. मात्र तो ३९ धावांवर असताना बोल्टने त्याला बाद केले. महेला जयवर्धने चार चेंडू खेळून भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर करुणारत्ने(१४), जीवन मेंडिस(चार), नुवन कालुसकेरा(१०), रंगना हेरथ(१३) धावा करुन बाद झाले आणि श्रीलंकेचा डाव २३३ धावांत संपुष्टात आला.
तत्पूर्वी, सामन्याच्या सुरुवातीला पावसाने व्यत्यय आणल्याने सामना उशिरा सुरु कऱण्यात आला. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम न्यूझीलंडला फलंदाजीस बोलावले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा फायदा घेत दमदार सुरुवात केली. सलामीवीर मॅकक्युलमने अर्धशतक साजरे केले आणि संघाच्या धावफलकावर १११ ही धावसंख्या असताना तो बाद झाला. मॅकक्युलमने ४९ चेंडूत ६५ धावा केल्या. त्यानंतर काही वेळातच सलामीवीर मॅट्रिनचा अडथळा लकमलने दूर केला. केवळ एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले.तिस-या क्रमांकावर खेळण्यास उतरलेल्या विल्यमसन्सनेही ५७ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्यानंतर आलेल्या रॉस टेलर आणि ग्राँट एलिओटला चांगली खेळी करु शकले नाहीत. हे दोनही फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कोरे अँडरसनने ४६ चेंडूत झंझावाती खेळ करत ७५ धावा केल्या आणि संघाला तीनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठून दिला.
श्रीलंकेकडून सुरंगा लकमल आणि जीवन मेंडिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर रंगना हेरथ आणि नुवन कालुसकेरा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड – सहा बाद ३३१(५०), ब्रॅडन मॅकक्युलम(६५),केन विल्यमसन्स (५७) आणि कोरे अँडरसन(७५)
श्रीलंका – सर्व बाद २३३(४६.१) लाहिरु थिरीमने(६५), अँजेलो मॅथ्यूज(४६)
सामनावीर – कोरे अँडरसन(न्यूझीलंड)