शिवसेनेचा धुडगूस, तरुणांना शिवीगाळ

0
9

नागपूर –व्हॅलेंटाइन डे आणि काही संघटनांचा विरोध, हे पारंपरिक युद्धच झाले आहे. मात्र, यंदा व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येलाच ही दहशत अनुभवायला मिळाली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शिवसैनिकांनी शहरात काही ठिकाणी तरुणांना शिवीगाळ केल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी बसलेल्या जोडप्यांशी अरेरावी केल्याने वातावरण अधिकच तापले.

शुक्रवारी ‘किस डे’ होता, तर शनिवारी व्हॅलेंटाइन डे साजरा होणार आहे. या निमित्ताने शहरातील काही सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणींची गर्दी जमते. यात मुख्यत्वे शहरातील फुटाळा, बॉटनिकल गार्डन आणि अंबाझरी तलाव या ठिकाणांचा समावेश असतो. या ठिकाणी जमलेल्या तरुण तरुणींना व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेचा विरोध सहन करावा लागला. शिवसैनिकांनी या परिसरांमध्ये गोंधळ घातला. चारचाकी गाड्यांवर बसलेले शिवसैनिक तरुण-तरुणींना शिवीगाळ करीत होते. अंबाझरी गार्डनसमोर शिवसैनिकांनी ग्रीटिंग्ज जाळले. तसेच तेथील प्रेमीयुगुलांशी हुज्जत घातली. याशिवाय घोषणाबाजी करून ‘शनिवारी व्हॅलेंटाइन डे साजरा करू नका’, अशा धमक्या दिल्या.

मुलींच्या चेहऱ्यावरील स्कार्फ काढले

अंबाझरी गार्डनमध्ये बसलेल्या काही प्रेमीयुगुलांना आणि तरुण-तरुणींना शिवसैनिकांनी अर्वाच्य शिवीगाळ तर केलीच, शिवाय तेथून पळून जाण्यास भाग पाडले. काही तरुणी चेहऱ्यावर स्कार्फ बांधून होत्या. त्या तरुणींना जबरदस्तीने स्कार्फ काढण्यास भाग पाडले. त्यामुळे या तरुणी घाबरलेल्या अवस्थेत दिसून येत होत्या.

बजरंग दलाची रॅली

बजरंग दलातर्फे शुक्रवारी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या विरोधात रॅली काढण्यात आली. गोरक्षण येथून निघालेली ही इशारा रॅली अंबाझरी गार्डन, फुटाळा तलाव, सिव्हिल लाइन्स या परिसरातून फिरली. या इशारा रॅलीद्वारे तरुणाईने विदेशी संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा न करता भारतीय संस्कृती स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.