इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे २०१८ आशियाई पॅरा गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. हा खेळ पॅन-एशियन मल्टी स्पोर्ट इव्हेंटमार्फत आयोजित करण्यात आला होता. यात भारतातील ६ अंध मुलींची निवड झाली होती. तिजलने आपले ध्येय गाठत चेस या स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक जिंकले आहे. तिजलचे दिल्लीत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तिचे स्वागत केले.
तिजल ही जन्मापासून ७५% अंध आहे. मात्र, तिजलच्या आई-वडिलांनी कधी मुले आणि मुलींमध्ये फरक केला नाही. त्यामुळे तिजलला सुरुवातीला धावण्याच्या स्पर्धेत आवड होती. मात्र, प्रकृती साथ देत नसल्याने तिचे धावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. परंतु, ध्येय वेड्या तिजलने हिम्मत न हारता मार्ग बदलत बुद्धिबळ स्पर्धेचे धडे घेण्यास सुरुवात केली. या आधी तिजलने जिल्हा स्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक पुरस्कार पटकाविले. प्रथमच तिने साता समुद्रापार जाण्याचे स्वप्न पहिले आणि ते देखील पूर्ण केले. सध्या तिजल ही नागपुरात आपल्या सासरी राहत असून, मेडल मिळाल्याची माहिती मिळताच माहेरच्या लोकांनी आणि गावकऱ्यांनी सितासावंगी ग्राम पंचायतीच्यावतीने तिजलचे जंगी स्वागत केले. तिजलने मिळवलेले यश सर्वच खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे.




