हरभजनसिंगचे भारतीय संघात पुनरागमन

0
11

वृत्तसंस्था
नवी दिल्ली -दि.20: बांगलादेश दौऱ्यासाठी आज (बुधवार) निवडण्यात आलेल्या भारतीय कसोटी संघात ऑफस्पिनर हरभजनसिंगने पुनरागमन केले आहे. तर, महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीमुळे कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले आहे.
आज झालेल्या निवड समितीच्या बैठकीत बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या 1 कसोटी व तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघाचा बांगलादेश दौरा 7 जूनपासून सुरू होणार आहे. एकमेव कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या संघात हरभजनसिंगला स्थान देऊन रवींद्र जडेजाला वगळण्यात आले आहे. आयपीएलमध्ये हरभजनसिंगने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. हरभजनसिंग व्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराजसिंग व झहीर खान यांच्या नावाचा निवड समितीने विचार केला नसल्याचे दिसत आहे.

एकदिवसीय संघाचे नेतृ्त्व महेंद्रसिंह धोनीकडे कायम आहे. दुखापतीने त्रस्त असलेला मोहंमद शमीला संघातून वगळण्यात आले आहे. तर, त्याच्याजागी धवल कुलकर्णी याला स्थान देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त विश्वकरंडक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय संघात कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही.

कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, हरभजनसिंग, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरूण ऍरॉन, ईशांत शर्मा.

एकदिवसीय संघ – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, धवन कुलकर्णी.