धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा,३३ कोटी १० लक्ष रुपये प्रोत्साहन मदत वाटप

0
8

गोंदिया,दि.२२ : गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्हयातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे धानाचे आहे. इथला तांदूळ आखाती देशात सुध्दा निर्यात केला जातो. जिल्हयाच्या अर्थव्यवस्थेत धान पिक हे महत्वपूर्ण आहे.
सन २०१४-१५ च्या हंगामात आलेल्या अवकाळी पाऊसामुळे व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ मे २०१५ च्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. या बैठकीतील निर्णयाप्रमाणे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरीक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल २५० रुपये मदत केली आहे. या मदतीमुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोंदिया जिल्हयातील ३६ हजार ७६० शेतकऱ्यांना ३३ कोटी १० लक्ष ८६ हजार २५० रुपये प्रोत्साहनपर मदत अर्थात बोनस म्हणून वाटप करण्यात आली आहे.
जिल्हयात खरीप हंगामात १ लाख ८८ हजार १६३ हेक्टर आणि रबी हंगामात १८ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर धान पिक घेण्यात येते. सन २०१४-१५ च्या हंगामात आलेल्या अवकाळी व नैसर्गिक आपत्तीत सुध्दा जिल्हयात धानाची विक्रमी खरेदी करण्यात आली. जिल्हयात पणन महासंघाच्या ४७ केंद्रातून सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या धानाची आणि राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या ४० केंद्रातून आदिवासी शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आली.
जिल्हयातील एकूण ८७ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ३० जून २०१५ पर्यंत १३ लाख ५ हजार ४४२ क्विंटल धानाची विक्रमी खरेदी करण्यात आली. पणन महासंघाच्या ४७ खरेदी केंद्रावर ७ लाख ४३ हजार ७६५ क्विंटल आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४० खरेदी केंद्रावर ५ लाख ८० हजार ५८३ क्विंटल धानाची खेरदी करण्यात आली.
पणन महासंघाच्या गोदिया तालुक्यातील १३ केंद्रावर १ लाख १२ हजार ३२२ क्विंटल, गोरेगाव तालुका- ५ केंद्रावर १ लाख १६ हजार ६९६ क्विंटल, अर्जुनी/मोरगाव तालुका- १० केंद्रावर १ लाख ८१ हजार ६१२ क्विंटल, आमगांव तालुका- २ केंद्रावर ६७ हजार ५९७ क्विंटल, सालेकसा तालुका- २ केंद्रावर २१ हजार ५७ क्विंटल, तिरोडा तालुका- ११ केंद्रावर १ लाख ८ हजार ५५९, सडक/अर्जुनी तालुका- ४ केंद्रावर १ लाख ३५ हजार ७१ क्विंटल असा एकूण ७ लाख ४३ हजार ७६५ क्विंटल धान सर्वसाधारण शेतकऱ्यांकडून आणि राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय देवरी अंतर्गत असलेल्या २४ केंद्रावर ३ लाख १७ हजार ५२८ क्विंटल नवेगावबांध अंतर्गत असलेल्या १६ केंद्रावर २ लाख ४४ हजार १४८ क्विंटल असा एकूण ५ लाख ६१ हजार ६७७ क्विंटल धान आदिवासी शेतकरी बांधवांकडून खरेदी करण्यातआला.
अ वर्गवारीतील धानाला १४०० रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण वर्गवारीतील धानाला १३६० रुपये प्रति क्विंटल दर देण्यात आला. १४०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे केवळ ७०२ क्विंटल धान पणन महासंघाने खरेदी केला. या धानाची किंमत ९ लाख ८२ हजार ८०० रुपये इतकी आहे.
पणन महासंघाने जिल्हयातील २० हजार ४५० शेतकऱ्यांकडून १०१ कोटी ५ लक्ष ६५ हजार ६८० रुपयांचा धान १३६० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे आणि आदिवासी विकास महामंडळाने जिल्हयातील १६ हजार ३१० शेतकऱ्यांकडून ७८ कोटी ९५ लक्ष ९१ हजार ५२० रुपयांचा धान खरेदी केला. पणन महासंघाने खरेदी केलेल्या धानाला प्रति क्विंटल २५० रुपये याप्रमाणे १८ कोटी ५९ लक्ष ४० हजार ७५० रुपये आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाला १४ कोटी ५१ लाख ४५ हजार ५०० रुपये असा एकूण ३३ कोटी १० लक्ष ८६ हजार रुपये बोनस अर्थात प्रोत्साहनपर मदत जिल्हयातील अडचणीतील सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हिताचा विचार करुन राज्य सरकारने दिली आहे. २५० रुपये प्रति क्विंटल प्रोत्साहनपर मदत केल्यामुळे जिल्हयातील धान उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.