एटापल्ली व धानोरातील २३ गावे विजेने प्रकाशली

0
10

गडचिरोली दि.०5: धानोरा व एटापल्ली तालुक्यातील २३ गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे काम महावितरणच्या मार्फत करण्यात आले आहे. गावात पहिल्यांदाच वीज पोहोचल्याने या गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला आहे.महावितरणचे आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक मस्के व तत्कालीन प्रभारी अधीक्षक अभियंता व सध्या ब्रह्मपुरी विभागाचे कार्यकर्ता अभियंता असलेले युवराज मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. ते पूर्ण करण्यात आल्याचे महावितरणने म्हटले आहे.
ज्या गावांपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा गावांना प्राधान्य देत त्या गावामध्ये वीज पोहोचविण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे. २० डिसेंबर २०१६ पासून वीज जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील तीन महिन्यात धानोरा तालुक्यातील मरकेगाव, पुत्तरगोंडी, मागदंडटोला, रेजूटोला, किसनेली, मोठाझेलिया, लहान वडगाव, सालईटोला, मारगीनटोला, हुर्राटोला, केहकावाही, धुरमुडाटोला, येरंडीटोला, भुसूनकुडो, दंबा, राणवाही, शिवगोटा ही १७ गावे व एटापल्ली तालुक्यातील एकराटोला, कुद्री, कामके, रोपी, पैदी, झुप्पी, धुसागुडा ही सहा गावे अशी एकूण २३ गावे जोडण्यात आली आहेत.