एक पाऊल स्वच्छतेकडे… पाच तालुके झाले हागणदारीमुक्त

0
9

कळमेश्वर, रामटेक व मौदा हागणदारीमुक्त
नागपूर जिल्ह्याची हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल
नागपूर,दि.9-स्वच्छतेचा विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ या आवाहनाला जनतेचा उत्स्फूर्द प्रतिसादामुळे कळमेश्वर, रामटेक, मौदा, तसेच कामठी व उमरेड तालुके हागणदारीमुक्त झाले आहे. जिल्ह्यातील 624 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. त्यामुळेच संपूर्ण जिल्हा मार्च अखेरपर्यंत हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने सज्ज आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत नागपूर जिल्हा हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून वाटचाल करत असून जिल्ह्यातील पाच तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. जिल्हा परिषदेतर्फे एक पाऊल स्वच्छतेकडे या अभियानाअंतर्गत स्वच्छतेचा सर्वांगिण विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यात आला आहे. उघड्यावरील शौचविधीचे निर्मूलन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी जनजागृतीपर माहिती शिक्षण व संवादाचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
केवळ शौचालय बांधण्यापूर्ताच हा उपक्रम न राहता शौचालयाचा नियमितपणे वापर करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील 30 लाख 5 हजार 927 कुटुंबापैकी 2 लाख 94 हजार 451 कुटुंबाकडे शौचालय बांधकाम पूर्ण झाले आहेत. आणि ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबांनीही शौचालय बांधकामास सुरूवात केली असून ती प्रगतीपथावर आहे त्यामुळे मार्च अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे.
कळमेश्वर, रामटेक व मौदा तालुके हागणदारीमुक्त जाहिर करण्यात आला असून कळमेश्वर पंचायत समितीअंतर्गत 51 ग्रामपंचायतीमधील 3 हजार 664 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. रामटेक तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीमध्ये 5 हजार 375 तर, मौदा तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीअंतर्गत 8 हजार 400 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत.
एक पाऊल स्वच्छतेकडे या अभियानाला जनतेचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे 68 हजार 477 वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून जिल्ह्यातील 624 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेले आहेत. सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज झाले आहे.

लेखक-अनिल गडेकर,जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय नागपूर मो.9890157788