अदानी फाऊंडेशनने तिरोड्यात कमी खर्चातून तयार केला बंधारा

0
212
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तिरोडा,दि.01 : बरेच शेतकरी शेतीला सिंचनासाठी नाल्याचा पाण्याचा वापर करतात. यासाठी नाला सरळीकरण आणि खोलीकरणावर शासन सुध्दा लाखो रुपयांचा खर्च करते. मात्र याच खर्चातून हेच काम करीत असताना बंधारा तयार करुन पाणी अडवून शेतीसाठी सिंचन केले जाऊ शकते. असाच कमी खर्चातून बंधारा तयार करण्याचा प्रयोग तिरोडा तालुक्यात करण्यात आला.अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारा दरवर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यातील गावामध्ये करण्यात येते. तलाव खोलीकरण, नाला रुंदीकरण, नाला खोलीकरण यासारखी कामे केली जातात. सन २०१७ च्या उन्हाळ्यात नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची पाहणी करण्याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी भेट देऊन त्यांनी एक संकल्पना सुचविली. त्यानुसार नाला खोलीकरण करीत असताना प्रत्येक १०० मिटर अंतरावर ५ ते ६ मिटरचा एक पट्टा तसाच ठेवायचा तो पट्टा नैसर्गिक बांधाचे काम करतो व त्या १०० मिटरच्या पट्यात नाल्याचे पाणी थांबून राहते. तसेच त्या ५ ते ६ मिटरच्या पट्यावरुन नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सुद्धा सोयीचे होते.काळे यांनी सुचविलेली संकल्पना अदानी फाऊंडेशनने प्रत्येक नाला खोलीकरणाच्या कामात अंमलात आणली आणि त्याचे फायदे दिसून येवू लागले. पावसाळ्यात नाले भरुन वाहतात. परंतु हिवाळ्याच्या शेवटी नाले कोरडे पडलेले दिसतात. परंतु सदरच्या संकल्पनेमुळे उन्हाळ्यात सुद्धा नाले तुडुंब भरलेले दिसत आहेत. पाणी वाहून न जाता ते पाणी जमिनीमध्ये झिरपल्याने पाणी पातळीत वाढ झाली तसेच नाल्याद्वारे वाहून जाणाारी माती सुद्धा जमिनीची धूप होणे थांबले. नाल्याच्या परिसरातील शेतकरी पाण्याचा वापर शेतीसाठी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे. नाला खोलीकरण करीत असताना प्रत्येक १०० मिटर, ५ ते ६ मिटरचा पट्टा खोलीकरणाच्या कामानंतर सोडल्यास होणारे फायदे, विलक्षण आहेत. तसेच या संकल्पनेमुळे अतिरिक्त खर्च न करता जलसाठा वाढतो तसेच शेतकºयांना ये-जा करण्यासाठी सोयीचे होते असल्याची माहिती अदानी फाऊंडेशनचे नितिन शिराळकर यांनी दिली.