दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा जंगलराज सांभाळा; अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांना टोला

0
87

मुंबई,दि.01 : हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणावरून आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर चोहुबाजुंनी टीका होऊ लागली आहे. आदित्यनाथ यांचा राजीनामा देण्याची मागणी वाढू लागली आहे. योगींवर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील टीका केली आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यांना सल्ले देत बसले आहेत. यापेक्षा त्यांनी त्यांच्या राज्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करावे आणि जंगल राजवर कडक कारवाई करावी, असा सल्ला दिला आहे.

योगींनी राजीनामा द्यावा : प्रियांका गांधी

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, या बलात्कारपीडित मुलीचा मृत्यू झाला याची बातमी तिच्या वडिलांना कळविण्यात आली, त्यावेळी नेमकी मी त्यांच्याशी फोनवर बोलत होते. ही मुलगी व तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यायचे सोडून योगी सरकारने त्यांच्या मानवी हक्कांवरच गदा आणण्याचे काम केले आहे.

योगी यांनी राजीनामा द्यावा.मायावती म्हणाल्या, नातेवाईकांना अंत्यसंस्कार करू न देता हे विधी पोलिसांनीच परस्पर उरकले हे चुकीचे वर्तन आहे.

अखिलेश यादव म्हणाले, मध्यरात्रीनंतर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले, कारण त्यांना सर्व पुरावे नष्ट करायचे होते.

पहिल्यांदा काही हैवानांनी बलात्कार केला. त्यानंतर साºया यंत्रणेने तेच कृत्य केले, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

राजीनाम्याची मागणी

उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज आहेत परंतु राज्य राजासारखं चालवत असून हे लोकशाहीला घातक आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला आहे.