नक्षल कमांडर दाम्पत्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
14

गडचिरोली, दि. १०: नक्षल्यांच्या प्लाटून क्रमांक १८ चा कमांडर व गट्टा दलमची उपकमांडर असलेल्या त्याच्या पत्नी नुकतेच पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सुक्कू उर्फ महारु राजू मुडयामी(३२) व गिरिजा उर्फ झुरी पुसू मट्टामी(२९) असे आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दाम्पत्याचे नाव आहे. सुक्कूवर १८ लाखांचे, तर गिरिजावर ६ लाखांचे बक्षिस होते.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्य शासनाच्या नव्या आत्मसमर्पण योजनेमुळे जिल्ह्यातील नक्षलवादी मोठया प्रमाणात आत्मसमर्पण करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी कोरची दलम कमांडर गोपी व चातगाव दलम कमांडर विजय उर्फ धनिराम केशरी दुग्गा यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे उत्तर व दक्षिण गडचिरोलीत कार्यरत दलम कमांडरमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन तेही आत्मसमर्पण करु लागले आहेत. याचीच परिणती म्हणून प्लाटून क्रमांक १८ चा कमांडर सुक्कू उर्फ महारु राजू मुडयामी व त्याची पत्नी गिरिजा मट्टामी यांनी आत्मसमर्पण केले. सुक्कू मुडयामी हा भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत मर्दहूर येथील रहिवासी आहे.२००१ मध्ये भामरागड दलममध्ये सहभागी झाला. २००६ मध्ये त्याची भामरागड दलममधून बदली करुन प्लाटून क्रमांक १८ मध्ये पाठविण्यात आले. २००९ पर्यंत तो या प्लाटूनचा कमांडर होता. त्याची पत्नी गिरिजा मट्टामी ही भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यांतर्गत आलदंडी येथील रहिवासी आहे. २००२ मध्ये ती भामरागड दलममध्ये सहभागी झाली.२००५ मध्ये तिची या दलममधून बदली करुन केएएमएसचे अध्यक्षपद देण्यात आले. २००७ मध्ये पुन्हा तिची केएएमएसमधून बदली करुन तिला गट्टा दलमची उपकमांडकर बनविण्यात आले. हे दोघेही आत्मसमर्पण करणार, अशी कुणकुण लागताच नक्षल्यांनी त्यांना २०१३ मध्ये अबुझमाडच्या जंगलात पाठविले. मात्र तेथून कशीबशी सुटका करुन दोघेही पळून आले आणि त्यांनी ७ ऑक्टोबरला आत्मसमर्पण केले. सुक्कू मुडयामी हा पेरमिली, हलवेरा, झारेवाडा, तुमरीकसा येथील चकमकी, कुंजेमरका येथील रंणजित होळी व जांभिया येथील संतोष नवळी तसेच पेरमिली येथील पोलिस अरुण फरकाडे यांच्या हत्येत सहभागी होता. गिरिजा कुंजेमरका व कुक्कामेटा येथील चकमकी, तसेच कुंजेमरका येथील रणजित होळी व जांभिया येथील संतोष नवळी यांच्या खुनात सहभागी होती. यंदा २८ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असून, त्यात तीन कमांडरचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
नक्षल्यांचा सर्वोच्च नेता गणपती याने यंदा शंभरहून अधिक नक्षली मारले गेल्याचे व यामुळे नक्षल चळवळीचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे मान्य केल्याचे नक्षल्यांकडून मिळालेली पुस्तके व डायऱ्यांवरुन दिसून आले, असेही संदीप पाटील यांनी सांगितले. आत्मसमर्पित नक्षल्यांना योग्य संरक्षण, राहण्यासाठी घरकुल तसेच आर्थिक व वैद्यकीय मदत दिली जाते. त्यामुळे नक्षल्यांनी कुठलाही संकोच न बाळगता आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.राजकुमार उपस्थित होते.