गोठणगावच्या कुशीत रतीराम राणेंनी फुलवली केळ्यांची बाग

0
39

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.10-पारंपरिक धान पीक पद्धतीत बदल करुन काही शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. एकरी उत्पादन क्षमता कमी आणि भावही कमी असल्यामुळे धान पिकाला पर्याय म्हणून आता शेतकरी नकदी पिकाकडे वळू लागले आहेत.जिल्ह्यात केळी पिकाची लागवड मोठ्याप्रमाणात होऊ लागली आहे.त्यातच सधन शेतकरी असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले,सहकार क्षेत्रात नेहमीच तत्पर राहिलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील शेतकरी रतिराम राणे यांनी पीक पद्धतीत बदल करुन गोठणगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
रतिराम राणेकडे एकूण 3.15 हेक्टर इतकी शेती आहे. दरवर्षी ते धान पीक घेत असायचे. परंतू धानातून पाहिजे तेवढे उत्पन्न होत नसल्यामुळे आर्थिक स्थितीत बदल होत नव्हता. कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन चांगल्याप्रकारे आधुनिक आणि नगदी पिकाची शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी डी.एल.तुमडाम यांचे मार्गदर्शन लाभले. कृषी विभाग वेगवेगळे कृषी विषयक प्रशिक्षण, मेळावे, दौरे व प्रक्षेत्र भेटीचे कार्यक्रम आयोजित करीत असल्यामुळे अनेक शेतकरी याचा लाभ घेत आहेत. यापैकीच रतिराम राणे हे एक शेतकरी आहेत.

रतिरामजींनी आपल्या 0.60 हेक्टर क्षेत्रावर 5 बाय 6 फुट अंतरावर 2300 केळीची लागवड केली. सुरुवातीला त्यांनी खताची मात्रा केळीला जमिनीतून दिल्या. नंतरच्या काळातील खत व्यवस्थापन हे ठिबक सिंचनाद्वारे केले. आपल्या काटेकोर व्यवस्थापनातून भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा केळीचे पीक चांगल्या स्थितीत ठेवले. यातून रतिरामजींना 46 टन कच्ची केळीचे उत्पादन झाले. भिलाई येथील व्यापाऱ्याशी संपर्क साधून प्रती टन 11 हजार रुपये या दराने व्यापाऱ्याने केळी खरेदी केली. यातून त्यांना 5 लाखाचे उत्पन्न मिळाले. केळीसाठी रतिरामजीला दीड लाख रुपये खर्च आला. खर्च वजा जाता 3 लाख 50 हजार रुपयांचा निव्वळ नफा 10 महिन्यात त्यांना मिळाला.

रतिरामजीने आता नगदी पीक घेण्याचे निश्चित केले. आर्थिक स्थिती सुधारण्यास केळी महत्वाची ठरली. रतिरामजीच्या केळी शेतीचे अनुकरण आता परिसरातील शेतकरी करु लागले आहेत. शेतकरी बांधवांनी आता नगदी पिकाकडे वळण्याची आवश्यकता असल्याचे रतिरामजींनी बोलून दाखविले.