नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या

0
10

गडचिरोली, दि.१६: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्रांतर्गत घोटपाडी येथील पोलिस पाटलाची गोळया झाडून हत्या केली.
पिडू बांगे पुंगाटी(५०) असे मृत पोलिस पाटलाचे नाव आहे. पिडू पुंगाटी हे आपल्या घरी झोपेत असताना १५ ते २० सशस्त्र नक्षल्यांनी त्यांना झोपेतून उठवून बाहेर नेले. त्यानंतर गोळया झाडून त्यांची हत्या केली. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी हे कृत्य केले. घटनास्थळी नक्षल्यांनी काही पत्रकेही टाकली. एसपीओ म्हणून पोलिसांना मदत कराल तर तुमचेही अन्य एसपीओसारखे हाल होतील, असे नक्षल्यांनी पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर भामरागड एरिया कमिटी असे लिहिले आहे.
पोलिसांना मदत करणे, गावची विकास कामे करणे तसेच विकासकामांचा पाठपुरावा करणे यासाठी नक्षल्यांनी पिंडू पुंगाटीची हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नक्षलवादी खचलेल्या मानसिकतेतून निष्पाप नागरिकांचा जीव घेत असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.