ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

0
14

वृत्तसंस्था

पोखरण (राजस्थान) दि. ७ :  भारतीय लष्कराने आज जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीमुळे पुन्हा एकदा ब्राह्मोसची मारक क्षमता स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मोबाईल ऍटोनॉमस लॉंचरच्या (माल) माध्यमातून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. 

या क्षेपणास्त्राने लष्कराने निश्‍चित केलेली सर्व उद्दिष्ट्ये प्राप्त केली आहेत. आज या क्षेपणास्त्राच्या चाचणीवेळी अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते, त्यांनी या चाचणीनंतर संशोधकांच्या टीमचे अभिनंदन केले. ब्राह्मोस हे आपल्याकडचे सर्वाधिक भेदक मारक क्षमता असणारे क्षेपणास्त्र असून आजच्या चाचणीमुळे पुन्हा एकदा त्याची परिणामकारकता स्पष्ट झाली असल्याचे ब्राह्मोस एअरोस्पेसचे प्रमुख सुधीर मिश्रा यांनी सांगितले. या यशाबद्दल संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव डॉ. एस. खिस्तोफर यांनी भारतीय लष्कर आणि वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.