बुधवारला आझाद मैदानात साजरी करणार शिक्षक दिवाळी

0
7

मुंबई –दि. १0 राज्य सरकारने वर्षानुवर्षे शिक्षकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ आमदार रामनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक बुधवारी (ता. 11) काळी दिवाळी साजरी करणार आहेत. आझाद मैदानात यावेळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

अनुदानास पात्र ठरवलेल्या शाळांना आणि वर्ग तुकड्यांना तातडीने अनुदान देणे, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करणे, सहावी ते आठवीच्या खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देणे, बी. एल. ओ. व एन. पी. आर. आदी अशैक्षणिक कामातून शिक्षक व मुख्याध्यापकांना मुक्त करणे, कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांच्या पदांबाबत संभ्रम दूर करणे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, निवडश्रेणीसाठी एम. ए. आणि मुक्त विद्यापीठाचा विज्ञान निष्णात पदविका ग्राह्य धरणे, वैद्यकीय खर्चाच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे आदेश पूर्ववत शिक्षणाधिकाऱ्यांना देणे, इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना पूर्ण वेतन मिळण्यासाठी उपाययोजना करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाबाबत तातडीने निर्णय घेणे, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना सणासाठी अग्रीम देणे, गृहकर्ज देणे, न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, सहावा वेतन आयोग येण्यापूर्वी राज्य, राष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढी किंवा ठोक रक्कम देणे, महाराष्ट्र खासगी शाळा नियमावलीच्या शेड्युल्ड-सीमध्ये बदल करण्यासाठी अधिसूचना काढणे आदींबाबत आमदार मोते यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक धरणे आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनात शिक्षक परिषदेसह मुख्याध्यापक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, विना व कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षक, तसेच कला, क्रीडा, संगीत व कार्यानुभव तसेच संस्थाचालक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी दिली.