सोमवारी अंत्यसंस्कार :कॉम्रेड भाई बर्धन कालवश

0
8

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते अर्धेन्दू भूषण उपाख्य भाई बर्धन यांचे शनिवारी रात्री येथील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून देश एका अभ्यासू आणि प्रामाणिक राजकीय नेत्यास मुकला आहे.
९२ वर्षीय बर्धन यांना गेल्या महिन्यात पक्षाघातानंतर उपचारार्थ येथील जी.बी. पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सायंकाळपासूनच त्यांची प्रकृती खालावली. काल त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते आणि त्यांचा श्‍वासोच्छवासही सामान्य होता. परंतु अचानक त्यांचा रक्तदाब कमी झाला. रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला,अशी माहिती पंत हॉस्पिटलच्या न्यूरॉलॉजी विभागाचे संचालक आणि प्रोफेसर डॉ. विनोद पुरी यांनी दिली. त्यांना मस्तिष्काघात झाला होता आणि ते कोमात होते,असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी सायंकाळी बर्धन अत्यवस्थ असल्याचे भाकपाचे राष्ट्रीय सचिव डी.राजा यांनी सांगितले होते. बर्धन यांच्या पश्‍चात त्यांचा मुलगा अशोक आणि मुलगी अल्का आहे. नागपूर विद्यापीठात प्रोफेसर राहिलेल्या त्यांच्या पत्नीचे १९८६ साली निधन झाले. बर्धन गेल्या काही काळापासून राजधानीतील भाकपा मुख्यालयातच वास्तव्याला होते. 

भाकपाचे माजी महासचिव ए. बी. बर्धन हे कामगार चळवळ आणि महाराष्ट्रातील डाव्या राजकारणाचा एक प्रमुख चेहरा राहिले आहेत. १९५७ साली अपक्ष उमेदवार म्हणून ते राज्य विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर त्यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) महासचिवपदाची जबाबदारी सांभाळली. आयटक ही भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना आहे. बर्धन १९९0 च्या दशकात दिल्लीत आले आणि भाकपाचे उपमहासचिव झाले. पुढे १९९६ साली इंद्रजित गुप्ता यांच्या जागी पक्षाचे महासचिव झाले. 
कॉम्रेड बर्धन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२४ साली आताच्या बांगला देशमधील सिलहट येथे झाला. परंतु नागपूरला त्यांनी आपली कर्मभूमी बनविले होते. राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणारा अत्यंत प्रामाणिक, सचोटीचा, निष्कलंक नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. बर्धन यांच्या शिक्षणाची सुरुवात नागपुरातून झाली. त्यांना सेंट जॉन हायस्कूलमध्ये थेट पाचव्या इयत्तेत प्रवेश देण्यात आला होता. यानंतर त्यांना पटवर्धन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. १९३९-४0 या शैक्षणिक वर्षात ते विदर्भातून दुसरे मेरिट आले होते. त्यावेळी ते अवघ्या १५ वर्षांचे होते. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. भाईंनी शिक्षणाचा एक टप्पा अत्यंत वेगाने व प्रभावी गुणवत्तेसह ओलांडला. त्यांनी शासकीय विज्ञान महाविद्यालयात बी.एससी. पदवीला प्रवेश घेतला होता. 
पुढे ते कष्टकरी वर्गाचा उत्तुंग नेता म्हणून उभे राहिले. कम्युनिस्ट पक्षाने जनसंघटनांची लढाऊ फळी उभी केली होती. तसेच, तरुणांनी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनची स्थापना केली. या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या फळीत भाई बर्धन यांचा समावेश होता. १९४0 मध्ये ते अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले होते. दरम्यान, त्यांनी सातवेळा तुरुंगवास भोगला होता. ४ जून १९५२ रोजी भाई बर्धन यांनी रंगनाथ रामचंद्र देव यांची कन्या पद्माताई यांच्याशी नागपुरातील न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला होता.