दोन अस्वलांना जाळून मारले

0
11

अड्याळ/पवनी,दि.२4-तणसीच्या ढिगाऱ्यात दोन अस्वलींची जाळून हत्या केली. ही गंभीर घटना अड्याळ वनपरिक्षेत्रातील किटाळी वनक्षेत्रात शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. किटाळी येथील हरिदास लक्ष्मण गेडाम व सायगाव येथील गणपत कानेकर यांच्या शेतातील तणसीच्या ढिगाऱ्यात या अस्वलींना जाळण्यात आले आहे. याप्रकरणी वनविभागाने तीन संशयीतांना वेगवेगळ्या ठिकाणाहून चौकशी करीता ताब्यात घेतले.या घटनेची चौकशी सुरू असून या घटनेचा तपास किटाडीचे सहाय्यक वनरक्षक जी.डी. लुटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दोन दिवसापूर्वी विरली (खंदार) येथील पुरूषोत्तम वाघधरे यांच्या घरात दीड वर्षाचे अस्वलाचे पिल्लू शिरले होते. त्याला वनकर्मचाऱ्यांनी शिताफिने पकडले होते. वनविभागाच्या ताब्यात अस्वलाचे पिल्ले असल्याने वनविभागाने परिसरात दोन अस्वल असण्याची शक्यता वर्तविली होती. त्या दोन अस्वलांचा अड्याळ वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व वन्यप्राणीमित्र शोध घेत होते. दरम्यान शुक्रवारला सायगाव येथील वनकर्मचारी एल.आर. कोरे यांना तणसीच्या ढिगाऱ्यात अस्वलांना जाळल्याचे दिसून आले. याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. घटनेचे गांभिर्य ओळखून वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट तात्काळ भेट दिली. प्रकरणाचे गांभिर्ण ओळखून त्यांनी तपासाला गती देत तीन संशयीतांना ताब्यात घेतले.