युग प्रकरणी आरोपींवर गुन्हा सिद्ध, ३ फेब्रुवारीला शिक्षेची सुनावणी

0
7

नागपूर- ८ वर्षीय युग चांडकच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींवर नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने गुन्हा सिद्द केला आहे.आता त्यांना येत्या ३ फेब्रुवारीला शिक्षेची सुनावणी करण्यात येणार आहे. राजेश डावरे आणि अरविंद सिंग यांच्यावर युगचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप होता. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने आजच्या सुनावणीत म्हटले.

एक सप्टेंबर २०१४ रोजी युगचे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापरू नगर भागातील गुरु वंदन अपार्टमेंट समोरून अपहरण करण्यात आले होते. युगचे वडील मुकेश चांडक हे डॉक्टर आहेत. युग शाळेतून परतला आणि अपार्टमेंटमधील वॉचमेनकडेच आपली बॅग ठेऊन, लगेच बाहेर धावत गेला. इमारतीच्यासमोर एका दुचाकीवर दोघे जण उभे होते. त्यांच्यासोबत युग काही क्षण बोलला आणि त्यानंतर त्यांच्याच सोबत दुचाकीवर बसून निघून गेला. उशिरापर्यंत तो न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले. दरम्यान, ज्या पद्धतीने युग शांततेने दोन्ही अपहरणकर्त्यांसह गेला होता, त्याचा विचार करता कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे नागपूर पोलिसांची अनेक पथक नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात युगचा शोध घेत होती.

या घटनेनंतर सर्वत्र नाकाबंदीही करण्यात आली होती. मात्र, तरीही युगचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर २ सप्टेंबर २०१४ रोजी संध्याकाळी नागपूर पासून २५ किलोमीटर अंतरावर लोणखैरी गावाजवळ एका निर्जनस्थळी पुलाच्या खाली पाईपमध्ये युगचा मृतदेह सापडला. अपहरणाची घटना समोर आल्यापासूनच पोलिसांनी अनेक संशयितांना पकडून चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं होते.

राजेश डावरे आणि अरविंद सिंग अशी या दोघांची नावं होती. यातील धक्कादायक बाब म्हणजे राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात अकाऊंटटण्ट म्हणून कामाला होता. मात्र, त्याने अकाऊंट्समध्ये काही घोळ केल्याने काही दिवसांपूर्वी त्याला डॉ. चांडक यांनी कामावरून काढले होते. त्याचा राग मनात ठेवून त्याने युगचे अपहरण केल्याचा आरोप होता.