युग चांडकच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा

0
12

नागपूर ,दि.4- युग चांडक या आठ वर्षीय निरपराध मुलाचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना आज (गुरुवार) जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविली. या निकालावेळी युगचे कुटुंबीय न्यायालयात हजर होते. नागपुरातील 10 वर्षीय युग चांडक अपहरण खून प्रकरणी दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. राजेश धनलाल दवारे (वय 19) आणि अरविंद अभिलाष सिंह (वय 23) अशी फाशी झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही नागपूरातील कामठी मार्गावरील पीडब्ल्यूएस महाविद्यालयाचे बी. कॉम. प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. युगच्या वडिलांनी नोकरीवरून काढून टाकून अवमानजनक वागणूक दिल्याचा बदला आणि खंडणी वसुलीतून युगचे 2014 साली सप्टेंबर महिन्यात अपहरण करून हत्या करण्यात आली होती. न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी आज हा निकाल दिला.

युग चांडक प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचा सक्षम युक्तिवाद बुधवारी सरकारी पक्षाने केल्यानंतर आज (गुरुवार) या प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष होते. समाजमन अस्वस्थ करून सोडणा-या या गुन्ह्याचे स्वरूप अतिशय भयावह असून, आरोपींनी ते पूर्ण जाणीव असताना केले आहे. खटल्यातील 50 साक्षीदारांपैकी कुणीही फितूर झाले नाही.  निर्घृणपणे करण्यात आलेल्या या हत्याकांडातील आरोपींना फाशीच देण्यात यावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी केली होती. युग चांडक अपहरण-हत्याकांडामध्ये दोन्ही आरोपींविरुद्ध लावण्यात आलेले भादंवि कलम ३०२, ३६४ (अ), १२० (ब), २०१ नुसार आरोप सिद्ध झाले होते. या अंतर्गत फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. बुधवारी बचाव आणि सरकारी पक्षाने आपली बाजू मांडली असून शिक्षेचा निर्णय आज लागला.

आरोपी राजेश हा डॉ. चांडक यांच्या क्लिनिकमध्ये काम करत होता. मात्र, कामादरम्यान झालेल्या वादातून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याचा बदला घेण्यासाठीच आरोपींनी युगचे अपहरण करून त्याचा खून केला. हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी डॉ. चांडक यांच्या घरी फोन करत खंडणीसाठी धमकीही दिली होती. युगची हत्या करून त्याचा मृतदेह शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर पाटणसावंगी गावाजवळ पुरण्यात आला होता.