विषमिश्रीत अन्न खाल्ल्याने मोराचा मृत्यू

0
12

  साकोली,दि.4- साकोली वनक्षेत्रांतर्गत  येणार्या सिरेगावटोला येथील कम्पार्टमेंट क्रमांक १३५ च्या परिसरात विषमिश्रीत अन्न खाल्याने एका मोराचा मृत्यू झाल्याची घटना १ फेब्रुवारीला उघडकीस आली.या घटनेने या भागात  अज्ञात शिकार्‍यांनी शिकारीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याची चर्चा  दिसून येत आहे.
कुख्यात वाघांचा शिकारी कुट्ट पारधी हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्याने आधीच वन विभागाची डोकेदुखी वाढली असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याने वन अधिकारी त्रस्त झाले आहेत.
सिरेगावटोला बिट क्षेत्रातून सानगडी-नवेगावबांध हा राज्यमार्ग जातो. या राज्यमार्गालगत नवेगावबांध येथून सिरेगावटोला व सिरेगावबांध या दोन गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पाटबंधारे विभागाने जलवाहिनी घातली आहे. ही जलवाहिनी वनक्षेत्रातून अनेक ठिकाणी फुटलेली आहे. त्यातून पाणी निघून तिथेच साचत असते.
जवळच घनदाट जंगल असल्याने तिथे अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. हे वन्यप्राणी याठिकाणी पाणी पिण्यासाठी येतात. याचाच फायदा शिकार्‍यांनी घेतला. शिकार्‍यांनी पानवठय़ाशेजारी विषमिश्रीत धान्य ठेवले होते. १ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजताच्या सुमारास या मार्गाने ये-जा करणार्‍या नागरिकांना पानवठय़ावर १0 ते १२ मोर पाणी पित असताना दिसले. त्यातील एक मोर हा मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्यातील एकाने याची माहिती वन विभागाला दिली. सानगडीचे वनरक्षक झंझाड, तिबुडे व वनमजूर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर साकोलीचे वनपरिक्षेत्राधिकारी येसनसुरे, क्षेत्र सहाय्यक तांडेकर, भुजाडे, डोरले व पिपल्स अँनिमल संरक्षण संस्थेचे सचिन रंगारी, सोनू ढेंगरे, विवेक डोंगरे घटनास्थळी पोहचले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांनी मोराचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.