नऊ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

0
10

विशेष प्रतिनिधी

गडचिरोली, दि.१४: १६ लाखांचे बक्षीस असलेल्या डीव्हीसीसह नऊ नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला नक्षल्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, गडचिरोली पोलिसांनी नवजीवन योजनेंतर्गत नक्षल्यांच्या कुटुंबीयांना भेट दिल्याचे परिणामही चांगले दिसू लागले आहेत. त्यामुळेच २०१५ मध्ये ५६, तर २०१६ च्या दीड महिन्यात १२ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

नुकतेच आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये नक्षल्यांच्या कसनसूर विभागीय समितीचा सदस्य(डीव्हीसी)सुनील उर्फ रामजी सुनसी मट्टामी, कंपनी क्रमांक ४ चा सेक्शन कमांडर शिवा उर्फ सत्तू उर्फ भिमा राजू नरोटे व त्याची पत्नी राखी उर्फ रेखा तिम्मा, कंपनी क्र.१० ची सदस्य मीरा देवू नरोटे, टिप्पागड दलम सदस्य कमला उर्फ रम्मी बाजीराव हिडको, गट्टा दलम सदस्य सोमजी उर्फ लेबू मोडी आतलामी, कसनसूर दलम सदस्य लक्ष्मण उर्फ लालू सोमा नरोटे, गट्टा दलम सदस्य दोडगे दुगे आत्राम, मंगू उर्फ रामजह आंदरु मट्टामी यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ४६ लाखांचे बक्षीस होते. डीव्हीसी सुनील मट्टामी याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. १७ चकमकी, १४ जाळपोळी व ९ हत्यांमध्ये सुनीलचा सहभाग होता. शिवा नरोटे ११ गुन्हयांत सहभागी होता. राखी तिम्मा हिने ९ गुन्हे केले आहेत, तर मीरा नरोटे ही २ गुन्हयांमध्ये सहभागी होती. कमला हिडको ही ११ चकमकी, एक जाळपोळ व २ खुनाच्या गुन्हयांत सहभागी होती. सोमजी आतलामी हा २ गंभीर गुन्हयांत सहभागी होता, तर लक्ष्मण नरोटेचा चकमकी, भूसुरुंगस्फोट यासह ५ गुन्हयांमध्ये हात होता. दोडगे आत्राम याने ३ गंभीर गुन्हे केले, तर मंगू मट्टामी याचा ३ चकमकी, ५ खून व अन्य प्रकारच्या १२ गुन्हयांमध्ये सहभाग होता.

टिप्पागड दलम सदस्य असलेली कमला हिडको ही उत्तर गडचिरोलीतील नक्षल्यांच्या जनताना सरकारचा प्रमुख सावजी ह्याची पत्नी आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कमलाने चोवीस तासांच्या आतच आत्मसमर्पण केल्याची माहिती  पाटील यांनी दिली. नक्षल्यांच्या एकूण दलमपैकी ५ दलम कमी झाले आहेत. या दलममधील सदस्यांची संख्या कमी झाल्याने हे दलम अन्‍य दलममध्ये विलीन करण्यात आले आहेत. त्यात गट्टा एलओएस, सुरजागड एलओएस, पेंढरी एलओएस, ५५, ५६ इत्यादी दलमचा समावेश असून, हे सर्व दलम प्लाटून दलममध्ये विलीन करण्यात आल्याने नक्षली बॅकफूटवर आले आहेत, असे संदीप पाटील म्हणाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नसबंदीची शस्त्रक्रिया पोलिसांनी रिओपन केल्याने त्यांना संतती सुखाचा लाभ मिळत असल्याचेही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आवर्जून सांगितले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक(प्रशासन) सुनील बाबर उपस्थित होते.