अपंगांना युनिव्हर्सल ओळखपत्र देणार- थावरचंद गेहलोत

0
11

अमरावती : भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यात अडचणी येऊ नयेत, म्हणून अपंगांना युनिव्हर्सल आयडेंटीटी कार्ड देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली.

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अपंग सबलीकरण विभाग नवी दिल्ली, भारतीय कृत्रिम अंग निर्माण  जबलपूर, अपंग जीवन विकास संस्था अमरावतीद्वारा संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील 1044 गरजू अपंगांना उपयुक्त साधनांचे वितरण श्री.गेहलोत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील होते. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, सर्वश्री आमदार डॉ.सुनिल देशमुख, डॉ.अनिल बोंडे, रमेश बुंदिले, महापौर रिना नंदा कौर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, संयुक्त सचिव अवनिश अवस्थी, शिवराय कुलकर्णी, दिनेश सुर्यवंशी, प्रशांत वानखेडे, रामेश्वर अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अपंगांच्या सक्षमीकरणासाठी माध्यमिक शाळा पूर्व व नंतर शिष्यवृत्ती तसेच देशांतर्गत तसेच परदेशांतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहेत.ऑलिम्पिकमध्ये झालेल्या स्पर्धेत अपंगांच्या टिममधील 173 खेळाडूंनी मेडल जिंकले तसेच आशियाई व विश्वचषक स्पर्धा जिंकून भारताने अंधांच्या क्रिकेट स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. भारतात राष्ट्रीयस्तरावरील पाच क्रीडा केंद्र उभारण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने विभाग व जिल्हास्तरावर ही असे केंद्र सुरु करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

अमरावती येथील जुनेद खान हा गतीमंद व मुकबधीर ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल त्याचा यावेळी गौरव करण्यात आला. अपंगांसाठी सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन ही यावेळी श्री.गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आले.