तैवानमध्ये भुकंपाचे २४ तासात १००हून अधिक धक्के

0
10

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तैवानमध्ये रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. येथे गेल्या २४ तासात १०० हुन अधिकवेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ एवढी होती. हा भूकंप तैवानपासून ८५ किमी पूर्वेला दुपारी १२.१४ वाजता जाणवल्याची माहिती आहे. तसेच तैवानच्या किनारपट्टीवर ७.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर जपानने सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे की, जपानला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या २४ तासांत तैवानच्या वेगवेगळ्या भागात १०० वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कुठे दरड कोसळल्याचे चित्र आहे, तर कुठे पूल पडल्याचे. येथे शनिवारीही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ एवढी होती. भूकंपामुळे काही घरांचे नुकसान झाल्याचे तैवान सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर रेल्वे सेवाही विस्कळीत झाली असल्याचे ते म्हणाले आहेत.

सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. लोकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ते म्हणाले, भूकंपामुळे दक्षिणेकडील काओशुंग शहरातील मेट्रो सेवा बराच काळ प्रभावित झाली होती. तैवान रेल्वे प्रशासनाने हुवालियन आणि तैटंगला जोडणाऱ्या गाड्या तात्पुरत्या थांबण्यात आल्या आहेत. यासोबतच हायस्पीड रेल्वे सेवाही रद्द करण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू ताइतुंग काउंटीच्या उत्तरेला असल्याचे सांगण्यात आले आहे.