बीएसएनएलचा सरव्यवस्थापक कांबळे याला लाच घेताना रंगेहाथ अटक

0
13

मुंबई- भारतीय संचार निगमच्या  रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागाचे सरव्यवस्थापक सुहास कांबळे याला दोन लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या प्रकरणी त्यांचा वाहनचालक तन्वीर बागवान यालाही अटक करण्यात आली आहे.
बीएसएनएलच्या एका ठेकेदाराच्या बिलाची रक्कम अदा करण्यासाठी कांबळे याने तीन टक्के कमिशनची मागणी केली होती. ही रक्कम अन्य एका व्यक्तीच्या खात्यावर भरण्यासाठी त्याचा वाहनचालक बागवानने व्यवस्था केल्याचा या दोघांवर आरोप आहे. या प्रकरणी कांबळे याचे निवासस्थान, तसेच सांगली आणि गोव्यातही गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारून मालमत्तेसंबंधीची कागदपत्रे, लॉकरच्या किल्ल्या, एटीएम कार्ड इत्यादी साहित्य जप्त केले आहे.