महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो – श्रीहरी अणे

0
7
नागपूर, दि. २६ – पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो असा आरोप करत आपण अजूनही वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचं श्रीहरी अणे बोलले आहेत. वेगळ्या मराठवाड्याच्या मुद्यावरुन झालेल्या गदारोळानंतर महाधिवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतरप्रथमच अणे नागपुरात आले होते यावेळी ते बोलत होते. नागपुरात संविधान चौकात श्रीहरी अणेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
विदर्भासाठीचा पैसा तसाच तिजोरीत राहतो. महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो. आम्ही काय खाणार यापेक्षा तुम्ही तुमची काळजी करा असा टोलाही श्रीहरी अणेंनी  महाराष्ट्रातील नेत्यांना लगावला आहे. विदर्भ वेगळा झाल्यास  महाराष्ट्र काय खाईल ? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. 60 वर्षात महाराष्ट्राने विदर्भाला धरणे दिली नाहीत. विदर्भाला साधं पाणीही मिळालं नाही.केंद्रात व राज्यात सध्या भाजप सत्तेत आहे. भाजपने स्वतंत्र विदर्भाचा शब्द दिला होता. यात त्यांना यश आले नाही तर ते त्यांचे अपयश असेल. याचा परिणाम असा होईल की भाजपला पुन्हा सत्ता मिळवणे कठीण होईल. आम्ही विदर्भातील सर्वांना (यात सर्वक्षीय नेतेही) लढा उभारण्याबाबत आवाहन करणार आहोत, असे अणेंनी म्हटले आहे.

अणे म्हणाले, यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सर्वांनी विदर्भावर अन्याय केला. विदर्भाचा विचार कधीच केला गेला नाही. दरवर्षी विदर्भाचा अनुशेष उर्वरित महाराष्ट्रात वळविला जातो. राज्यपालांनी आदेश देऊनही हा निधी दिला जात नाही. विदर्भाप्रमाणे मराठवाड्यावरही अन्याय होत आलाय. म्हणूनच मी मराठवाडाही स्वतंत्र झाला पाहिजे असे मत मांडले. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे माझे पाय तोडू म्हणतात पण ते जाऊ द्या. ते माझे पक्षकार आहेत. अगदी बाळासाहेबही होते. पण ती त्यांची भूमिका नसून शिवसेनेची आहे. सरकार फार काही करू शकत नसल्याची स्थिती आहे. मराठवाड्यात शेती करायला सोडा प्यायला पाणी मिळत नाही यावरून स्थिती पाहा. विदर्भात धरणे का बांधली गेली नाहीत. शेतक-यांना तर वा-यावरच सोडून दिले आहे अशी टीका अणेंनी केली.
मी भाजपचा किंवा संघाचा नाही असे सांगत अणे पुढे म्हणाले की, माझे आजोबा बापूजी अणे हे काँग्रेसचे आमदार-खासदार होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण विदर्भाला काँग्रेसने वेगळे देण्यास विरोध करताच त्यांनी काँग्रेस सोडली व काँग्रेसच्या विरोधात उभे राहून निवडून आले. मी ना काँग्रेसचा आहे ना भाजपचा सदस्य आहे. संघाच्या शाखेत मी आयुष्यात कधीही गेलो नाही. त्यामुळे आम्हाला जो पाठिंबा देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ किंवा त्यांना आमच्यासोबत घेऊ असेही अणेंनी सांगितले.