पीलभीत बनावट चकमक, ४७ पोलिसांना जन्मठेप

0
13
नवी दिल्ली, दि. ४ – दहा शीख यात्रेकरुंना दहशतवादी दाखवून बनावट चकमकीत त्यांची हत्या करणा-या ४७ पोलिसांना विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २५ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशच्या पीलभीतमध्ये ही घटना घडली होती.
विशेष न्यायालयाने शुक्रवारी या ४७ पोलिसांना बनावट चकमकीच्या आरोपामध्ये दोषी ठरवले होते. १२ जुलै १९९१ रोजी उत्तरप्रदेशच्या पीलभीतमध्ये पोलिसांनी शीख यात्रेकरुंनी भरलेली बस जबरदस्तीने थांबवली. त्यातील १० प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरवले होते.
त्यानंतर या यात्रेकरुंना वेगवेगळया पोलिस स्थानकात नेऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत होती. सीबीआयने एकूण ५७ जणांना आरोपी केले होते. मात्र खटल्याच्या सुनावणी दरम्यान १० जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी अतिरेक्यांना मारण्यासाठी पुरस्कार होते. त्यासाठी हे हत्याकांड घडवण्यात आले.