चातगाव दलमच्या महिला नक्षलीचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
9

गडचिरोली,-: चातगाव दलमची सदस्य असलेल्या एका जहाल नक्षलवादी महिलेने नुकतेच पेंढरी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. अनिता उर्फ सुखदी तुलावी रा.चिमरीकल, ता.धानोरा असे आत्मसमर्पण केलेल्या महिलेचे नाव आहे.

अनिता तुलावी ही गेल्या ९ वर्षांपासून नक्षल दलम व कंपनीत कार्यरत होती. २००७ ते मार्च २०१६ या कालावधीत तिने लाहेरी, मुंगनेर, चिचोडा, बोधीन इत्यादी ठिकाणी झालेल्या चकमकीत  भाग घेतला. २७ मार्च २०१२ रोजी  पुस्टोला येथे झालेल्या भूसुरुंगस्फोटात केंद्रीय राखीव दलाचे १३ जवान शहीद झाले होते. हा स्फोट घडवून आणण्यातही तिचा सहभाग होता. तिने आत्मसमर्पण करावे, यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न चालविले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अनिताने ६ एप्रिलला पेंढरी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पेंढरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत पासलकर, पोलिस उपनिरीक्षक सर्वश्री गोविंद खैरे, गणेश खराडे, हिमालय जोशी, हवालदार मनिराम दुग्गा, राजकुमार चिंचेकर आदींनी अनिताचे आत्मसमर्पण घडवून आणले. नक्षल चळवळीतील ज्येष्ठ कॅडर असलेल्या अनिताने आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे.