पर्यटन क्षेत्रात नवेगावबांधची वेगळी ओळख निर्माण करणार- पालकमंत्री

0
11

गोंदिया,दि.११ : निसर्गाने भरभरुन दिल्याने गोंदिया जिल्हा वन समृद्ध व जलसंपन्न आहे नवेगावबांधचाही परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असून पर्यटनाच्या क्षेत्रात नवेगावबांधची आगळी-वेगळी ओळख निर्माण करु. असा विश्वास पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.
१० एप्रिल रोजी नवेगावबांध येथील हॉलीडे होम्स परिसरात जिल्हा वार्षिक योजनेतून क वर्ग पर्यटनस्थळ विकास मुलभूत सुविधा अंतर्गत ५६ लक्ष रुपयांच्या तलाव सौंदर्यीकरण व बोटींग सुविधा संबंधीच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दयाराम कापगते होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशीम जामा कुरेशी, पंचायत समिती सदस्य गुलाब कोरेटी, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, माजी सभापती प्रकाश गहाणे, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष अण्णा पाटील डोंगरवार, तहसिलदार बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, माजी पं.स.सदस्य महादेव बोरकर, उद्यान बचाव संघर्ष समितीचे नवल चांडक, विजय डोये, रामदास बोरकर, केवलदास पुस्तोडे यांची उपस्थिती होती. नवेगावबांध पर्यटनस्थळासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या देखरेख समितीवर स्थानिकांना सहभागी करुन घेण्यात येईल. नवेगावबांध येथे पक्षी अभयारण्य स्थापण्याचा विचार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून कार्यकारी अभियंता श्री.ढोरे म्हणाले, नवेगावबांध पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतील. त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. ५६ लक्ष रुपये खर्चुन येथे चौपाटी, बोटींगकरीता जेटी व धरणाच्या भिंतीचे व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला नवेगावबांध येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन श्री.भेलावे यांनी केले. उपस्थितांचे आभार व्ही.एम.श्रीवास्तव यांनी मानले.