माजी आमदार दीपक आत्राम यांच्या अंगरक्षकाची नक्षल्यांकडून हत्या

0
11

गडचिरोली,-: अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपकदादा आत्राम यांच्या अंगरक्षकाची नक्षल्यांनी आज दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केली. नानाजी नागोसे(४५) असे शहीद जवानाचे नाव आहे. ही घटना अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलिस ठाण्यापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या छल्लेवाडा येथे घडली.अहिंसेचा संदेश देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती कार्यक्रमातच नक्षल्यांनी हिंसक कृत्य केल्याने सर्वत्र निषेध केला जात आहे.

आज छल्लेवाडा येथील नागरिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम सभापती अजय कंकडालवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात दीपकदादा आत्राम भाषण देत असताना त्यांचे अंगरक्षक नानाजी नागोसे हे बाजूला पाणी पिण्यासाठी गेले असता साध्या वेशभूषेतील नक्षल्यांनी घेराव घालून त्यांच्यावर गोळया झाडल्या. यात नागोसे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी ५ नक्षलवादी आले होते व त्यांनी नागोसे यांची छाती व पोटावर पाच गोळया झाडल्या आणि नंतर ते जंगलाच्या दिशेने पळून गेले, असे सांगण्यात येत आहे. दीपकदादा आत्राम हेच नक्षल्यांचे टार्गेट होते. परंतु ते थोडक्यात बचावले, अशी चर्चा आहे. घटनेनंतर पोलिसांनी रेपनपल्ली येथे नानाजी नागोसे यांचा मृतदेह आणला. तेथून हेलिकॉप्टरने अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात मृतदेह आणण्यात आला. शहीद नागोसे हे प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात हवालदार म्हणून कार्यरत होते. तसेच ते मागील तीन वर्षांपासून दीपक आत्राम यांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते.